बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावा
By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 12:18 PM2020-12-21T12:18:59+5:302020-12-21T12:43:14+5:30
west bengal assembly election: पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; भाजपनं जोर लावल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.
एका बाजूला भाजपनं विधानसभेसाठी आक्रमकपणे तयारी सुरू असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. 'पश्चिम बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडताना भाजपला संघर्ष करावा लागेल. भाजपचं समर्थन करणारा माध्यमांमधला गट त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत आहे,' असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझं ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन, असंदेखील किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 21, 2020
PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!
गेल्या काही दिवसांत तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. प्रशांत किशोर यांच्या ट्विटला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून किशोर यांना खोचक टोला लगावला आहे. 'पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरू आहे. सत्तांतर झाल्यावर देश एका निवडणूक रणनीतीकाराला मुकेल,' अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी पलटवार केला आहे.
भाजपा की बंगाल में जो सुनामी चल रही हैं, सरकार बनने के बाद इस देश को एक चुनाव रणनीतिकार खोना पड़ेगा।
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) December 21, 2020
विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलनं प्रशांत किशोर यांच्याशी करार केला आहे. प्रशांत किशोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियपणे काम करत आहेत. मात्र तृणमूलचे अनेक वरिष्ठ नेते किशोर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्ष सोडलेल्या अनेक नेत्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. प्रशांत किशोर आपल्या कामात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत असल्याचा या नेत्यांनी नोंदवला आहे.