ममता सरकारला धक्क्यावर धक्के सुरूच; आता 'या' माजी क्रिकेटरने दिला मंत्री पदाचा राजीनामा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 5, 2021 03:50 PM2021-01-05T15:50:33+5:302021-01-05T15:51:27+5:30
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणे सुरूच ...
कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणे सुरूच आहे. आता, ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला.
लक्ष्मी रतन शुक्ला हे बंगाल सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मात्र, अद्याप ते तृणमूल काँग्रेसचेच आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रतन शुक्ला यांची राजकारण सोडण्याची इच्छा आहे. त्यांनी मंत्री पदाशिवाय हावडाच्या टीएमसी जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.
लक्ष्मी रतन शुक्ला यांनी भारतासाठी तीन वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय ते आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राजकारणात आले. ते बंगालच्या उत्तर हावडातून आमदारही झाले. यानंतर ममता सरकारमध्ये त्यांना क्रीडामंत्री बनवण्यात आले होते.
अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ -
पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले.
पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते, की काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल.
अंतर्गत सर्वेक्षणात TMCचं नुकसान -
तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.
टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.
भाजपच्या रोड शोदरम्यान विजयवर्गीय यांच्या गाडीवर फेकण्यात आला बूट -
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि टीएमसी यांच्यातील द्वंद्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या दोन्ही पक्षांच्या झटापटी आणि आरोप प्रत्यारोपही वाढतच आहेत. येथे सोमवारी भाजपच्या रोड शोदरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय आणि मुकूल रॉय यांच्या गाडीवर बूट फेकण्यात आला. भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांवर बूट फेंकण्याचा आरोप केला आहे. तर टीएमसी नेत्यांनी आरोप केला आहे, की भाजप समर्थक मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल अपशब्द बोलत होते. सध्या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.