कोलकात्यात भाजपचा रोड शो, 'या' बड्या नेत्याच्या गाडीवर फेकला बूट; टीएमसीवर आरोप
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 4, 2021 09:21 PM2021-01-04T21:21:03+5:302021-01-04T21:24:43+5:30
भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांवर बूट फेंकण्याचा आरोप केला आहे. तर टीएमसी नेत्यांनी आरोप केला आहे, की भाजप समर्थक मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल अपशब्द बोलत होते.
कोलकाता - बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि टीएमसी यांच्यातील द्वंद्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या दोन्ही पक्षांच्या झटापटी आणि आरोप प्रत्यारोपही वाढतच आहेत. आता ताजी घटना कोलकात्यातील आहे. येथे भाजपच्या रोड शोदरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय आणि मुकूल रॉय यांच्या गाडीवर बूट फेकण्यात आला आहे.
भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांवर बूट फेंकण्याचा आरोप केला आहे. तर टीएमसी नेत्यांनी आरोप केला आहे, की भाजप समर्थक मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल अपशब्द बोलत होते. सध्या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
खरेतर, भाजपच्या या रोड शोला कोलकाता पोलिसांनी परवानगी दिली नाही. तरीही बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी, भाजप रोड शो करणारच, असे म्हटले होते.
दिलीप घोष म्हणाले होते, कोलकाता विभागाचे भाजपचे नवे पर्यवेक्षक आणि माजी शहर महापौर सोवन चटर्जी सोमवारी महानगरात एक रोड शो करतील. ही "शांतीपूर्ण रॅली" किडरपोरहून मध्य कोलकात्यातील भाजपच्या मुख्यालयापर्यंत निर्धारित मार्गाने काढली जाईल. मात्र, ते स्वतः या रॅलीत सहभागी होऊ शकले नाही.
या रोड शोमध्ये विजयवर्गीय यांच्यासह मुकूल रॉय आणि अर्जुन सिंहदेखील सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांना टीएमसी कार्यकर्त्यांकडे जाण्यापासून रोखले आणि भांडण टाळले.
तत्पूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा डिसेंबर महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. यात त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप भाजपाने केला होता.