West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:25 PM2021-06-04T18:25:10+5:302021-06-04T18:53:13+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीला उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात होता. पण आता पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ममता बॅनर्जी याआधीपासूनच केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सवाल उपस्थित करत आल्या आहेत. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
मोदींच्या फोटोबाबत केली होती तक्रार
विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेसनं कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाणं हे निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं भंग असल्याचा आरोप तृणमूलनं केला होता.
पश्चिम बंगाल सरकारकडून मोफत लसीकरण
पश्चिम बंगालमधील जनतेला मोफत लसीकरण केलं जात आहे. प्रत्येक लसीसाठी सरकारचा ६०० ते १२०० रुपयांचा खर्च होत आहे. राज्यात आतापर्यंत १.४ कोटी जनतेचं लसीकरण झालं आहे.