'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 06:26 PM2019-04-13T18:26:28+5:302019-04-13T18:34:07+5:30

मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केलेला नाही.

'what about the expenditure on Raj Thackeray campaign rallies; bjp asks election commission | 'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार?'

'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार?'

Next
ठळक मुद्देराज यांनी भाजपाला मत देऊ नका, असं सांगितलं. पण, कुणाला मत द्यायचं हे सांगणं खुबीने टाळलं.राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवला जाणार आहे, असं भाजपाने विचारलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात, राहुल गांधींना एक संधी देण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी ते राज्यभरात आठ-दहा सभाही घेणार आहेत. त्यातली पहिली सभा नांदेडला झाली. त्यात राज यांनी भाजपाला मत देऊ नका, असं सांगितलं. पण, कुणाला मत द्यायचं हे सांगणं खुबीने टाळलं. या पार्श्वभूमीवरच, राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजपा नेते विनोद तावडे यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवला जाणार आहे, यासंदर्भात राज्य निवडणुक  आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केलेला नाही. मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या,  शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार राज ठाकरे करत आहेत. परंतु, या प्रचार सभांचा खर्च काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवत नाही. राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नाव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परंतु राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे राज यांची सभा जिथे होईल, त्या ठिकाणच्या आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सभेचा खर्च दाखवला जावा, अशी आग्रही भूमिका विनोद तावडे यांनी मांडलीय. 

राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी, ते कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचं स्पष्टीकरण घ्यावं आणि या संदर्भातील निवडणूक आयोगाचा नियम स्पष्ट करावा, असं भाजपाने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अश्वनी कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Web Title: 'what about the expenditure on Raj Thackeray campaign rallies; bjp asks election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.