मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:09 IST2021-05-08T14:08:11+5:302021-05-08T14:09:52+5:30
: देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.

मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला
कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.
मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालमधील निकालानंतर टीका केली. त्यावर पाटील यांनी भुजबळ यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या गायकवाड अहवालाचे इंग्रजी भाषांतर करताना काही चुका झाल्यात का हे देखील स्पष्ट व्हायला हवे. याबाबत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजूनही मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात आहे हे लक्षात घेवून राज्य सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण चांगल्या पध्दतीने काम करू शकू असे वाटल्याने त्यांनी पहिल्यांदा सारथी आणि नंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या नियोजन विभागातंर्गत घेतले आहे. आता बघू ते काय करतात ते.
गडकरींना जमले ते शासनाला का नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेल्या औषध कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आणि तेथून आता ३० हजार रेमडेसिविर इंजक्शन्सचे उत्पादन सुरू झाले. जे गडकरींना जमते ते राज्य शासनाला का जमत नाही असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
गायकवाडना एकदा तरी बोलावले का
आम्ही नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी गायकवाड यांनी याकामी इतके झोकून देवून काम केले की त्यांच्या डोळ्याची पापणी पॅरालाईज झाली. माझा एक अधिकारी त्यांना रोज रूग्णालयात नेवून आणत असे. तिथे उपचार झाले की पुन्हा ते कार्यालयात येवून काम करत होते. इतके योगदान देणाऱ्या गायकवाड यांना एकदाही चर्चेसाठी बोलवावे असे गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना का वाटलं नाही अशीही विचारणा पाटील यांनी केली.