राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:27 AM2019-04-17T00:27:47+5:302019-04-17T00:28:29+5:30
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
मुरुड : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करावयाची व मुस्लिमांची मते मिळवायची; परंतु या राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षात ही मते घेऊन मुस्लीम समाजासाठी कोणते विधायक काम केले आहे. फक्त मते घेतलीत, विधायक काम काही नाही. मतांच्या जीवावर या मंडळींनी कोट्यवधींची माया जमवली, म्हणूनच ही निवडणूक मी भ्रष्टचार विरुद्ध लढत असून या निवडणुकीत सदाचाराचा विजय निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड शहरात झालेल्या जाहीर सभेत केले आहे.
मुरुड शहरात शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी गीते बोलत होते. अनंत गीते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे.
आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांंना आत्महत्या करावी लागली आहे; परंतु हेच पैसे जर सिंचनात लागू केले असते तर बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना असून नवीदला रायगड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद भेटत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मला हरवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले तरी मला त्यांचे आव्हान वाटत नाही. जनता सुज्ञ असून कोणाला मतदान करायचे हे त्यांना चांगले अवगत आहे. पुढील काळात कोकणाला सतावणारे प्रमुख प्रश्न पाणी व रस्ते यासाठी पाच हजार कोटी रुपये केंद्राकडून आणून विशेष विकास करणार असून, कोणताही तालुका टँकरग्रस्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पैशाच्या मस्तीवर निवडणूक जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत, मतदार हुशार झाला आहे. लोकांना कोण चांगला व वाईट हे कळत असून आगामी निवडणुकीत याची प्रचिती येणार आहे. पुढील काळात मुरुड नगरपरिषदेस केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले.
नवीद अंतुले यांनी कोकणच्या विकासाला खरी चालना शिवसेनाच देऊ शकते यासाठीच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उस्मान रोहेकर यांनी सांगितले की, मीना बाजारातील ५२ गाळे तोडले गेले व शेकडो लोक बेरोजगार झाले, गाळे तोडणार नाही, असे आश्वासन सुनील तटकरे यांनी दिले होते; परंतु नंतर फसवणूक केली, अशा लोकांचे शाप तटकरे यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे ते या वेळी म्हणाले.
यावेळी नवीद अंतुले, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.