पाकला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या जयजयकारात गैर काय?; राजनाथ सिंह यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:08 AM2019-04-25T05:08:46+5:302019-04-25T05:09:36+5:30
मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका
मीरा रोड : इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले, तेव्हा इंदिराजींचा जयजयकार होऊ शकतो, मग पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून मोदींचा जयजयकार का नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी शिवार उद्यानात आयोजित सभेसाठी राजनाथ आले होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर डिम्पल मेहता, आमदार प्रताप सरनाईक व नरेंद्र मेहता, सभापती रवी व्यास, गटनेते हसमुख गेहलोत आदींसह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. सभेचे ठिकाण लहान असल्याने उपस्थितांची संख्या कमी होती. काँग्रेस सरकारने ३० वर्षांत लढाऊ विमाने खरेदी केली नाहीत. आज राफेल विमान असते, तर देशात बसूनच पाकिस्तानातील अतिरेक्यांवर कारवाई करता आली असती; पण विरोधक फक्त मोदींना रोखण्याचा नकारात्मक विचार घेऊन खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. सीमेवर गोळीबार झाल्यास १७ वेळा पांढरे निशाण फडकवले जायचे. ते आपण बंद करायला लावले. गोळीला गोळ्यांनी उत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे राजनाथ यांनी सांगितले.
‘पवारांनी हवा ओळखलीय’
युती झाल्याने शरद पवारांनी देशाची हवा ओळखून उमेदवारी मागे घेतली, असा चिमटा काढतानाच, पवारांचा खूप आदर करतो, असेही ते म्हणाले. नेहरूंपासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस गरिबीचा मुद्दा पुढे करत आली आहे; पण इतकी वर्षे सत्तेत असूनही गरिबी हटवण्यासाठी उपाययोजना का केल्या नाही, असा सवाल राजनाथ यांनी या वेळी केला.
‘इव्हीएममध्ये घोटाळा नाही’
नालासोपारा : इव्हिएम मशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही. जर असे काही असते, तर राजस्थान-मध्य प्रदेश-छत्तीसगड राज्यात काँग्रेसची सत्ता कशी आली? त्यामुळे काँग्रेसचा हा आरोप म्हणजे केवळ दुतोंडीपणा आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत ते बोलत होते. सिंह म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएमबद्दल काँग्रेस नेते का बोलले नाहीत? असा सवालही त्यांनी केला. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी युतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून, हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तुतिसुमने त्यांनी उधळली.