मिलिंद देवरा यांना जेव्हा मिळतो मुकेश अंबानींचा पाठिंबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:58 AM2019-04-19T05:58:50+5:302019-04-19T05:59:25+5:30
भाजप आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापारीवर्गाची मते आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : भाजप आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापारीवर्गाची मते आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी देशातील मोठ्या हिरे व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांचा पाठिंबा मिळविला आहे.
मिलिंद देवरा यांना २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फटका बसला. यंदाच्या लोकसभेतही भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेना निश्चिंत झाली आहे. परंतु, भाजपच्या पारंपरिक मतदारांनाच लक्ष्य करून या वेळची लढाई अटीतटीची असेल, याचे संकेत देवरा यांनी दिले आहेत. अनुप मेहता, रसेल मेहता आणि भरत शाह अशा देशातील मोठ्या हिरे व्यापाºयांबरोबर देवरा यांनी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत बैठक घेतली होती. देशातील हिरे व्यापाºयांचे उद्योग संकटात असताना त्यांचे पिता मुरली देवरा यांनी त्यांना जीवदान दिल्याचे स्मरण त्यांनी या वेळी करून दिले. आता देवरा यांनी देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक त्यांचे समर्थन करीत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला.
मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिलिंद देवराच योग्य असल्याचे म्हटले आहे. १० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देवरा यांना येथील सामाजिक, आर्थिक आणि संस्कृतीचे सखोल ज्ञान आहे, असे ते म्हणतात. विशेष म्हणजे त्यांचे बंधू अनिल अंबानी यांना राफेल करारावरून काँग्रेसने घेरले असताना मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उदय कोटक यांनीही देवरा यांनाच मत देण्याचे आवाहन केले आहे.
>व्हिडीओत आहे काय?
व्हिडीओत छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया असून त्यांनी देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. देवरा यांच्या विरोधात सेनेचे उमेदवार अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.