राहिल्या त्या आठवणी! दिवंगत मित्राच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर मंत्री नितीन राऊत भारावतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:25 PM2021-06-23T19:25:05+5:302021-06-23T19:26:17+5:30
प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे हे नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये वनस्पती शास्त्र (बॉटनी) विषयाचे प्राध्यापक होते.
मुंबई - माणूस कितीही मोठा झाला तरी आपला जुने मित्र परिवार भेटला की तो त्यांच्या जुन्या आठवणीत रममाण होतो. ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्याबाबत असाच काहीसा प्रत्यय आला. बुधवारी औरंगाबाद येथून डॉ राऊत यांचे जुने मित्र व स्नेही प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे यांचे कुटुंब पर्णकुटी बंगल्यावर भेटायला आले असता नितीन राऊत हे आपल्या जुन्या मित्राच्या कुटुंबीयांना भेटून भारावून गेले.
प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे हे नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये वनस्पती शास्त्र (बॉटनी) विषयाचे प्राध्यापक होते. त्यावेळी डॉ. राऊत हे शिक्षण घेत होते, तेव्हापासून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण व कौटुंबिक संबंध होते. १९७६ साली नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झालेले प्राध्यापक बलखंडे हे २००८ साली निवृत्त झाले. त्यानंतर नागपूरहून औरंगाबाद येथे स्थलांतर होऊनही नागपूरमधील मित्र परिवारासोबत स्नेहबंध त्यांनी कायम ठेवले होते. तशीच मैत्री डॉ राऊत यांनी बलखंडे सरांसोबत जपली. गृहराज्यमंत्री झाल्यावर डॉ राऊत यांनी औरंगाबाद येथे जाऊन बलखंडे सरांची भेट घेतली होती. २०१४ साली बलखंडे सरांच्या निधनानंतरही राऊत आणि बलखंडे कुटुंबाचा जिव्हाळा आजही कायम आहे.
बलखंडे यांच्या ७२ वर्षीय पत्नी सुहासिनी यांनी आज डॉ. नितीन राऊत यांच्या मलबार हिलमधील शासकीय निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी डॉ. नितीन राऊत आणि त्यांच्या पत्नी सुमेधा राऊत यांची भेट घेतली. यावेळी नागपूरमधील जुन्या कौटुंबिक आठवणीत राऊत कुटुंबीय रमले आणि त्यांना गहिवरून आले. राऊत यांनी आदराने आणि आपुलकीने विचारपूस केल्यानंतर सुहासिनी बलखंडे यांनाही अश्रू अनावर झाले!
"राऊत आणि बलखंडे कुटुंबात जवळपास ४ दशकांचे घट्ट नाते आहे. अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही एकमेकांना सोबत केली आहे. आज राऊत आणि त्यांच्या पत्नीशी चर्चा करताना अनेक भावूक आठवणींची उजळणी झाली. माझ्या पतीच्या निधनानंतरही हा जिव्हाळा आणि आपुलकी कायम असल्याचे अनुभवून माझे डोळे भरून आले," असे सुहासिनी बलखंडे यांनी सांगितले.