पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? कैलाश विजयवर्गीय यांनी केली महत्त्वाची घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 07:05 PM2021-01-20T19:05:45+5:302021-01-20T19:07:59+5:30
west bengal assembly election 2021Update : पश्चिम बंगलच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपा कुणाचे नाव पुढे करणार असा प्रश्न विचारला जात आहे.
कोलकाता - यावर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत बंगाली मतदारांनी दिलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फोडून भाजपाने ममता बॅनर्जींना जोरदार धक्के दिले आहेत. आता पश्चिम बंगलच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपा कुणाचे नाव पुढे करणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत घोषणा करताना कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, भाजपा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरा जाणार आहे. बहुमत मिळवल्यानंतर पक्षनेतृत्व आणि विजयी आमदार राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतील.
पश्चिम बंगालमध्ये यावर्षी एप्रिल-मे या काळात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आपल्याला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाध्यक्ष जेपी नड्डा हे सातत्याने बंगालचा दौरा करत आहेत.
२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २११ जागा जिंकल्या होत्या. तर डाव्यांना ३३, काँग्रेसला ४४ आणि भाजपाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार कामगिरी करत १८ जागांसह ४०.३ टक्के मते मिळवली होती.