कोण आहे नीरज गुंडे; देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संबंध काय आहे?; नवाब मलिकांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 07:01 AM2021-03-28T07:01:16+5:302021-03-28T07:01:44+5:30
सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.
मुंबई : रश्मी शुक्ला यांचा कथित अहवाल नीरज गुंडे या व्यक्तीने ट्विट केला होता. हा गुंडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा बंगल्यावर, तत्कालीन पोलीस आयुक्त, तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त यांच्या दालनात सतत जात होता. हा व्यक्ती कोण आहे? त्याचे आणि फडणवीस यांचे संबंध काय आहेत? सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.
शुक्ला यांनी माफी मागितली होती
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी विस्तृत अहवाल दिला आहे. अहवालात रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची येऊन माफी मागितली, त्यांच्या परिवारातील अडचणी सांगितल्यामुळे सहानुभूती म्हणून त्यांच्यावर कारवाई केली नव्हती, हे देखील अहवालात नमूद आहे.
एनआयए ‘त्यांचा’ जबाब कधी घेणार?
मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा डीव्हीआर गायब झाला असून, एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसांपासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल तर राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, १० मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरीत्या ताब्यात घेतला, परंतु दोनच तासांमध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली, असे लक्षात आल्याने एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून फोन गेला.