नवमतदारांचा कौल कोणाला?
By यदू जोशी | Published: April 18, 2019 05:12 AM2019-04-18T05:12:21+5:302019-04-18T05:15:29+5:30
विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले.
- यदु जोशी
मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यात निवडणूक आयोगाने राबविलेली विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी राबविलेले अभियान, त्यासाठी जाहिरातींद्वारे केलेली जनजागृती आणि नवमतदारांचा प्रतिसाद यामुळे दोन महिन्यात १२ लाख ३० हजार मतदार वाढले. निवडणूक निकाल बदलवू शकेल इतकी मोठी ही संख्या आहे. नवमतदारांचा कौल त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या मतदारांपैकी ८५ टक्के हे नवमतदार असून ते या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत. ३० मार्चपर्यंत राज्यात मतदार नोंदणीचे काम सुरू होते. त्यानंतर आता आयोगाने राज्यातील एकूण अंतिम मतदारसंख्या दिली आहे. त्यानुसार आता राज्यात ८ कोटी ८५ लाख ६१ हजार ३४५ मतदार आहेत. दोन महिन्यांपूर्वी हाच आकडा ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ इतका होता. पुरुष मतदारांची एकूण संख्या ४ कोटी ६३ लाख १४ हजार ७७६ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी २२ लाख ४४ हजार ३७ आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीने प्रभावित तरुणाईने भरभरुन मतदारनोंदणी केली, असे भाजपचे म्हणणे आहे. तर मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे निघत असताना बघून हे सरकार पुन्हा नको, या भावनेने मोठ्या प्रमाणात नवमतदारांनी नोंदणी केली, असे काँग्रेसने म्हटले आहे. दोन महिन्यांत साडेबारा लाखने वाढलेले हे मतदार कुणाकडे वळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
महिला उमेदवार वाढले
२०१४ मध्ये राज्यात ६९ महिला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यावेळी ही संख्या ११ ने वाढून ८० इतकी झाली आहे. राज्यात सध्या भावना गवळी, सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे आणि हिना गावित या ६ महिला खासदार आहेत.
२०८६ तृतीयपंथी मतदार
राज्यात तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या २ हजार ८६ इतकी आहे. त्यात सर्वाधिक मतदारसंख्या (३२४) ही उत्तर मुंबईत आहे. बोटावर मोजण्याइतके कमी तृतीयपंथी मतदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, लातूरचा समावेश आहे.
>सर्वाधिक मतदार ठाण्यात
ठाणे हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा मतदारसंघ आहे. त्या खालोखाल मावळ, नागपूर, शिरुर, शिर्डी, पुणे या मतदारसंघांचा क्रम लागतो. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण-मध्य, गडचिरोली-चिमूर आदी मतदारसंघांत कमी मतदारसंख्या आहे.