मराठा आरक्षण विरोधाचा बोलविता धनी कोण? - भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:14 AM2019-04-18T06:14:08+5:302019-04-18T06:14:22+5:30
अमित शहा यांच्याविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांनीच मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : अमित शहा यांच्याविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांनीच मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. अमित शहा आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर त्यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे मराठा आरक्षणाच्या विषयात वकीलपत्र घेत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, राज्य सरकारने श्रीहरी अणे यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. पुढे त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि भाजपच्या विरोधात प्रचार केला. अणे यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच प्रचार केला होता. ही वस्तुस्थिती आहे. उलट न्या. लोया प्रकरणात अमित शहा यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्त्या आहेत. सदावर्ते हे पाटील यांचे वकील आहेत. मग अमित शहा यांच्या विरोधात याचिका करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर याचा बोलविता धनी कोण हे आपण जनतेला सांगावे, असे आव्हान तावडे यांनी दिले.
>‘सुशीलकुमार शिंदेंनी माफी मागावी’
तावडे म्हणाले की, सहानुभूती मिळविण्यासाठी काँग्रेस नेते भावनिक आवाहन करीत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक माझी शेवटची असल्याचे म्हटले आहे. सोलापूरचे जे प्रश्न आज आपण मांडत आहात ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस हायकमांडचे जवळचे असताना का सोडविले नाहीत, असा सवालही तावडे यांनी केला. राजकारणातून निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही तावडे यांनी केली.
काँग्रेसचे दुसरे नेते अशोक चव्हाणसुद्धा सहानुभूती गोळा करीत आहेत. आता मला वाचवा, असे ते मतदारांना सांगत आहेत. पण चव्हाण वर्षानुवर्षे राजकारणात असूनही त्यांनी जनतेची कामे केली नाहीत. सहानुभूती दाखवून नाही, जर जनतेची कामे केली तर जनता तुमच्या पाठीशी उभे राहते, असा टोलाही तावडे यांनी लगावला.