आपण कोणाचे खासदार, हाच संभाजीराजेंच्या मनातला संभ्रम : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:40 PM2021-06-12T18:40:14+5:302021-06-12T19:39:44+5:30
Maratha Reservation Politics Sangli : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर भाजपचे खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही आंदोलन करावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू. मात्र, आम्हाला चालढकल मान्य नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
इस्लामपूर (जि. सांगली) : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर भाजपचे खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही आंदोलन करावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू. मात्र, आम्हाला चालढकल मान्य नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
पेठनाका येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य सरकारला वाचवायचे का मराठा समाजाला, याचा अगोदर विचार करून संभाजीराजेंनी निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी बदललेली भूमिका संशय निर्माण करणारी आहे. पहिल्यांदा कोल्हापुरातून मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यानंतर आमदार-खासदारांना जाब विचारू, असे म्हटले. आमदार-खासदारांना जाब विचारून हा प्रश्न सुटेल का, त्यासाठी सरकारला धारेवर धरावे लागेल.
पाटील म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे काढण्याचा निर्णय रद्द करून तुम्ही राज्य सरकारला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहात का, हेसुद्धा एकदा कळायला हवे. कधी मूक मोर्चा, तर कधी लाँग मार्च काढण्याची भूमिका घेत या प्रश्नावर चालढकल केली जात आहे, ती आम्हाला मान्य नाही. जे कोणी मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढतील, आंदोलन करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत.
वाघ पिंजऱ्यात असल्याचे त्यांना मान्य!
वाघाशी दोस्ती करण्याच्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील कलगी-तुरा अजूनही सुरू आहे. पिंजऱ्यातल्या वाघाच्या मिशीला हात लावायला या, असे राऊत यांनी म्हटल्याचे पत्रकारांनी सांगताच पाटील म्हणाले, ह्यराऊत असे म्हणत आहेत, म्हणजे वाघ जंगलात नसून पिंजऱ्यात आहे, हे त्यांनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राऊत यांचे आभार मानतो.ह्ण
मराठा, ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीकडून राज्याचा बट्ट्याबोळ
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, अशीच महाविकास आघाडी सरकारची मानसिकता आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणात या सरकारने राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
पवारांचा पत्ता चुकला !
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्रे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. हीच पत्रे पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवायला सांगितली पाहिजे होती. त्यामुळे कदाचित त्यांनी लक्ष घातलेही असते. मात्र, पवारांचा पत्ता चुकला असे वाटते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.