"गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"

By कुणाल गवाणकर | Published: November 4, 2020 12:38 PM2020-11-04T12:38:50+5:302020-11-04T12:44:26+5:30

Arnab Goswami arrested: अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली

why is bjp so angry with arnab goswami arrest asks shiv sena leader anil parab | "गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"

"गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"

Next

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

गोस्वामी यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,' असं राऊत म्हणाले. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं.



भाजप नेत्यांचं ठाकरे सरकारवर शरसंधान
भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.



तर एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.



त्याचसोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदणीय आहे, आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले आहे.



अर्णब गोस्वामींना अटक; रायगड पोलिसांची कारवाई
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे ५ वाजता मुंबई पोलिसांच्या सीआययु प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर करणार आहेत.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

Web Title: why is bjp so angry with arnab goswami arrest asks shiv sena leader anil parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.