"नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा"; शिवसेना नेत्याची मागणी
By प्रविण मरगळे | Published: November 20, 2020 01:19 PM2020-11-20T13:19:34+5:302020-11-20T13:21:38+5:30
Nitin Raut, Shiv Sena Narendra Patil News: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने लोकांना चांगलं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायेत.
मुंबई – राज्यातील वीजबिलावरुन विरोधकांचे लक्ष्य ठरलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनीच टीका केली आहे. मराठा तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
याबाबत नरेंद्र पाटील म्हणाले की, २०१९ ला मराठा समाजातील बऱ्याच तरूणांनी महावितरणाच्या वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा दिल्या. त्यामध्ये एसईबीसी कोट्यातून मराठा तरूण पासही झाले, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार आम्ही एसईबीसीमधून उत्तीर्ण झालेल्या मराठा तरुणांना कामावर ठेऊ असं सांगत आहेत, पण महावितरणाचे महाव्यवस्थापक संचालक असीम गुप्ता यांनी एका परिपत्रकात सांगितलं आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून सध्या वीज वितरण कंपनीत एसईबीसीच्या उत्तीर्ण मुलांना कामावर ठेवता येणार नाही असं म्हंटलं, मग राज्याचे ऊर्जामंत्री मराठा तरुणांची दिशाभूल का करत आहे हे कळत नाही असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने लोकांना चांगलं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायेत, मात्र हे खोटे बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जातीनं या गोष्टीत लक्ष घालावं, मराठा तरूणांची थट्टा करू नये, एकीकडे राज्यातील वीजग्राहकांची थट्टा सुरु आहे, १०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करु असं सांगितलं, तेही करत नाही अशी टीका करत नितीन राऊत यांनी एसईबीसी तरुणांना कामावर घेणार या विधानाची तपासणी करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
वाढीव वीजबिलावरुनही नितीन राऊत अडचणीत
भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव तयार झाल्याचेही व अर्थ खात्याबरोबर बैठक झाली असेही संगितले व राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात प्रस्ताव आणला जाणार असे जाहीर करून घुमजाव केल्याबद्दल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.