'राऊत परिवार' दूर का पळताहेत? आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे; किरीट सोमय्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 01:20 PM2020-12-29T13:20:04+5:302020-12-29T13:25:06+5:30
'ईडी'वरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) बजावण्यात आलेल्या समन्सनंतर राजकीय वातावरण अधिकच तापू लागले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यात आता भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. ईडीच्या चौकशीपासून राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ''ईडीचे हे तिसरे समन्स आहे. मात्र, तरीही संजय राऊत यांचे कुटुंबीय ईडीसमोर हजर राहत नाहीत. संजय राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत? पीएमसी बँक, एचडीआयएल बँक, प्रवीण राऊत आणि संजय राऊत कुटुंबात झालेल्या कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत या परिवारात नेमके काय विशेष नाते आहे?'', असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी ट्विट करून विचारला आहे.
This is 3rd Summons of ED. Sanjay Raut Family not appearing before ED
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020
Why Sanjay Raut Family running away?
ED Investigating Crores of Rupees Transactions between PMC Bank, HDIL, Pravin Raut Family & Sanjay Raut Family
What is Special Relations of Sanjay Raut Pravin Raut Family
'मनी ट्रेल, कॅश ट्रेल'चा तपास व्हायला हवा
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी रुपये चोरले असून, एचडीआयएल आणि प्रवीण राऊत कुटुंबात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोन कुटुंबातही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या दोन्ही परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून, हा पैसा कुठून आला? आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
"राऊत परिवार" माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे HDIL शी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ' मनी ट्रेल, कॅश ट्रेल' चौकशी झालीच पाहिजे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020
एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली?
एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ₹ 5400 कोटी चोरले आहे
PMC साठी हे महत्वाचे आहे pic.twitter.com/eY8rgMhVme
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.