कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असताना नव्या संसदेवर खर्च कशाला?: कमल हसन
By मोरेश्वर येरम | Published: December 13, 2020 02:42 PM2020-12-13T14:42:43+5:302020-12-13T14:44:52+5:30
सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली
नव्या संसदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी या नव्या संसदेच्या गरजेबाबतचे काही सवाल उपस्थित केले आहेत.
सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे.
कमल हसन यांनी एक ट्विट केलं आहे. "चीनच्या भिंतीची निर्मिती होत असताना हजारो लोक मारले गेले. पण त्यावेळी प्रशासनानं दावा केला होता की लोकांच्या सुरक्षेसाठी भिंत उभारणं गरजेचं होतं. आता भारतात नव्या संसद भवनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. देशात कोरोनाकाळात अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना भूकेलं राहावं लागलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मग अशावेळी नव्या संसदेची गरज आहे का?", असं कमल हसन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. संसद भवनाची निर्मिती हा खरंतर २० हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. सरकारच्या योजनेनुसार चार मजली संसद भवन हे ६४,५०० वर्ग मीटर परिसरात तयार केले जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच २०२० साली नव्या संसदेचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. नव्या संसदेत लोकसभेच्या सभागृहात ८८८ इतकी आसन व्यवस्था असणार आहे. तर सेंट्रल हॉलमध्ये १२२४ इतकी आसन क्षमता असणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह भूकंप विरोधी इमारतीचं बांधकाम असणार आहे.