मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 03:49 PM2021-01-31T15:49:40+5:302021-01-31T15:50:59+5:30
Ashish Shelar : मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून रविवारी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
मुंबई : आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील 739 तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांची शासन सेवेत का नियुक्ती दिली जात नाही. या तरुणांवर शासन अन्याय करते आहे, त्यांना तातडीने न्याय द्या, अशी विनंती भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून रविवारी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. या तरुणांचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन या तरुणांच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.
याचबरोबर, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या 739 उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करुन प्रक्रिया पूर्ण केली होती तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही? याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यात नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग या 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करते आहे? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.
आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील 739 तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पुर्ण झाली, त्यांना शासन सेवेत नियुक्ती मिळाव्यात म्हणून उपोषण करणाऱ्या तरुणांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा दिला! pic.twitter.com/Stv47cSu7M
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 31, 2021
तसेच, अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला, तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना मिळावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका शासनाने घ्यावी, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केली. दरम्यान, या तरुणांचे निवेदन स्वीकारून त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.