पुढच्या 25 वर्षांचा करार करून सत्तेत येणार; दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा एल्गार
By हेमंत बावकर | Published: October 25, 2020 07:29 PM2020-10-25T19:29:08+5:302020-10-25T19:30:15+5:30
Sanjay Raut On Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील प्रयत्नांवर भाष्य केले.
मुंबई : शिवसेनेचे सरकार जे देशभरात ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाते, ते पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगतिले. शिवाय पुढील्या पाच वर्षांनी सुद्धा सत्तेत येणारच आणि त्यापुढील 25 वर्षांचा जनतेसोबत करार करून सत्तेत राहणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली.
याचबरोबर त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांना फटकारले. फलाना फलाना नेते दिल्लीतून सांगतात महाराष्ट्रातील सरकार पाडण्य़ासाठी मुंबईत 200 कोटी रुपये पाठविले आहेत. अरे मुंबईसाठी 200 कोटी रुपये हा फार कमी आकडा आहे. तुम्हाला शोभतील असे 2000 कोटी, 5000 कोटी असे आकडे सांगा. 200 कोटी हा तुमच्यासाठी महापालिकेचा आकडा झाला. कोणीही कितीही कारस्थाने केली, तरीही ठाकरे सरकार राहणार आहे, असे राऊत म्हणाले. आमच्यामागे 11 कोटी जनतेचा आशिर्वाद असल्याचे राऊत म्हणाले.
आता यापुढे सारे महा होणार आहे. हा महाविजयादशमी सोहळा आहे. आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखणार असल्याचे राऊत म्हणाले. 1 वर्ष होऊन गेले. जेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणालो, त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, असे सांगत त्यांनी सेनापती बापट यांच्या ओळी ऐकविल्या. थोड्याच दिवसांत कळेल की देशाचे नेतृत्व महाराष्ट्रच करणार आहे, ते कोण करणार हे आम्हाला माहिती आहे, असे राऊत म्हणाले. एक शिवसैनिक लाख शिवसैनिक, आपण मराठी आहोत सगळे, असे राऊत म्हणाले. तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनातून आराम पडावा आणि ते पुन्हा राज्याच्या सेवेत रुजू व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण समोर कोणतरी पैलवान हवा, असेही राऊत म्हणाले.