सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू- आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:35 PM2019-04-04T12:35:21+5:302019-04-04T12:49:36+5:30
प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त विधान
यवतमाळ: सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. पुलवामाबद्दल बोलू नका, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिला असताना अशा पद्धतीनं का रोखलं जातं, असा सवाल आंबेडकरांनी यवतमाळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना विचारला. आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं.
यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित करताना आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्यावर बोलू नका, अशी सूचना दिल्यावरुन आंबेडकरांनी आयोगावर घणाघाती हल्ला चढवला. 'जर घटनेनं आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार दिला असेल, तर निवडणूक आयोगाकडून अशा सूचना कशा काय दिल्या जातात, हे जाणून घ्यायला मला आवडेल,' असं म्हणत सत्तेत आल्यास निवडणूक आयोगालादेखील सोडणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला. 'सत्ता मिळाल्यास त्यांना दोन दिवस तुरुंगात टाकू. कारण निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नाही. भाजपाचा सहकारी पक्ष म्हणून त्यांचं काम सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी आघाडी केली आहे. आंबेडकर भारिपा बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या बहुजन वंचित आघाडीकडून सोलापूर आणि अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. सोलापूरात त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं आव्हान आहे. आंबेडकरांनी निवडणूक अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानं या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.