कन्हैया कुमार डाव्यांची साथ सोडणार? नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 10:10 AM2021-02-16T10:10:40+5:302021-02-16T10:12:23+5:30
Will Kanhaiya Kumar leave the CPI : भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
पाटणा - जेएनयूमधील आंदोलनानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील प्रमुख चेहरा बनलेले कन्हैया कुमार आणि भाकपामधील संबंध गेल्या काही काळात बिघडले आहेत. त्यातच आता भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कन्हैया कुमार हे डाव्यांची साथ सोडून जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाशी संबंधित एका अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर कन्हैयावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहे.
दरम्यान, कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ही भेट झाल्याचे या सूत्रांनी म्हटले. मात्र भाजपाकडून राज्यमंत्री झालेल्या सुभाष सिंह यांनी या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी कन्हैया कुमारचा उल्लेख मानसिक रुग्ण असा केला असून, अशी भेट अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
याभेटीबाबत जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सांगितले की, कन्हैया कुमार यांनी त्यांची विकृत विचारसरणी सोडली तर त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल. राजकीय जाणकारांच्या मते कन्हैया कुमारची ही भेट म्हणजे विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या जेडीयूकडून राज्याच्या राजकारणात आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
कन्हैया कुमार याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत गिरिराज सिंह यांनी कन्हैया कुमार यांचा दारुण पराभव केला होता.