मीच केले म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार का? शिवसेनेचा नारायण राणेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:29 PM2020-12-20T17:29:11+5:302020-12-20T17:30:43+5:30
Chipi Airport: चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे.
सावंतवाडी : चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग जिल्हयात येते. त्यामुळे केंद्र सरकार विमान वाहातूकीस परवानगी देत असले तरी रस्ते पाणी हे राज्य सरकारच पुरवत आहेत. त्यामुळे कोण मी करणार असे म्हणत असेल तर ते शक्य नाही. सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने चिपी विमानतळ सुरू होणार असून, मी म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार नाहीत. त्यांंना चिपीतच यावे लागेल, असा जोरदार टोला राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला आहे.
ते मळगाव येथे शिवसेना पदाधिकाºयांच्या आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, विक्रांत सावंत उपस्थीत होते.
मंत्री सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे. या विमानतळाकडे जाणाºया रस्ता, पाणी, विज यासाठी सरकार तसचे आमदार, खासदार नियोजनचा फंड खर्च झाला आहे. त्यामुळे सर्व काहि मीच करणार असे म्हणने योग्य नाही. विमानतळ सुरू करणे हा सांघिक प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून सुरू करूया असे म्हणने योग्य ठरणार आहे. मी केले म्हणतात ते विमान दिल्लीतून उडवणार आहेत का, त्यांना चिपीतच यावे लागणार आहे. असा टोला ही सामंत यांनी लगावला आहे.
मागील काहि वर्षात प्रलंबित राहिलेले सर्व प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन येत्या महिनाभरात होणार असून, त्यासाठी १ कोटि ४९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेजचा जलद मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्र्यानी स्वत: लक्ष घालून हा शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न सोडवून दिला. या महाविद्यालयासाठी लागणारे डिनही नेमण्यात आले आहेत. तसेच येत्या काहि महिन्यात आम्ही प्रवेश प्रकियाही सुरू करणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. आता हा प्रस्ताव मेडिकल कौन्सीलकडे जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे ओरोस येथेच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जे बोलत होते त्यांनी आतापर्यत काय केले हा प्रश्न त्यांनाच द्यावा लागेल. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी सांघिक प्रयत्न करून विकासकामे कुठे थांबता नये यासाठी प्रयत्न केले. चांदा ते बांदा योजना ही सुरू होणार आहे. मात्र त्या योजनेचे नाव काय असावे याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. मी व आमदार दीपक केसरकर हे मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याना भेटून याबाबतची माहीती दिली असून या योजनेवर निर्णय घेण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.