...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ
By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 12:31 PM2020-11-23T12:31:32+5:302020-11-23T12:34:30+5:30
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याची तयारी सुरू
मुंबई: लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. यानंतर आता राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारनं लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा केल्यावर त्याचा अभ्यास करू, असं राऊत म्हणाले.
लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी
'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील सरकारं लव्ह जिहादविरोधात कायदा करणार आहेत. त्यानंतर आता भाजपचे राज्यातील नेतेही लव्ह जिहादविरोधी कायदा कधी करणार, असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारत आहेत. याबद्दल मी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कायदा होऊ दे. त्यानंतर बिहारमध्ये कायदा होऊ दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करू. यानंतर राज्य सरकार चर्चा करून निर्णय घेईल,' असं राऊत यांनी सांगितलं.
Some people are raising this issue in Maharashtra too, asking us that when will we bring a law? I spoke with the CM today, I would like to say that when Nitish ji frames this law in Bihar, we will examine it and then think about the same, for Maharashtra: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/bedTTrTGE5
— ANI (@ANI) November 23, 2020
'बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार यांना आम्ही भाजपचे मुख्यमंत्री समजतो. कारण सर्वाधिक आमदार भाजपचे असल्यानं सरकारवर त्यांचंच नियंत्रण आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिहार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा करू दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात लव्ह जिहादचा प्रश्न मोठा नाही. अर्थव्यवस्था, मंदी, बेरोजगारी, महामाई यासारख्या अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्या देशासमोर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
वाढीव वीज बिलांविरोधात आज राज्यभरात भाजपची आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. वाढीव वीज बिल प्रश्नावरून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटावं, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी इंधन दरांकडेही लक्ष वेधलं. 'आम्ही वाढीव वीज बिलावरून जनतेला दिलासा देऊ. पण भाजपच्या नेत्यांनी इंधन दराकडे लक्ष द्यावं. त्यातूनही जनतेला दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही कमी व्हायला हवेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल, डिझेलचे दर ४५ ते ५० रुपये असायला हवेत. यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,' असं राऊत म्हणाले.