Winter Session: हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?; बीएसीच्या निर्णयाकडे लक्ष
By यदू जोशी | Published: November 6, 2020 10:36 AM2020-11-06T10:36:54+5:302020-11-06T10:44:27+5:30
Maharashtra Assembly Winter Session News: मंत्रिमंडळाचा हा सूर लक्षात घेता आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता नाही.
यदु जोशी
मुंबई - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार असून या बाबतचा औपचारिक निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिवेशन मुंबईतच घ्यावे असा सूर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत निघाला. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत नागपूर अधिवेशनाबाबत चर्चा झाली. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी गर्दी टाळणे, सोशल डिस्टंन्सिग राखणे जरुरी आहे.
नागपुरात अधिवेशन घेतले तर संपूर्ण यंत्रणा काही दिवसांसाठी नागपुरात हलवावी लागेल. प्रत्यक्ष अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टंन्सिगचा बोजवारा उडेल, असे मत मंत्रिमंडळ बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केले. नागपूरचे एक कॅबिनेट मंत्री अधिवेशन घेण्याबाबत आग्रही होते. अधिवेशन घेतले नाही तर ‘मेसेज’ चांगला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. सूत्रांनी सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशन झालेच पाहिजे अशी जनभावना असते हे खरे असले तरी यंदा परिस्थिती वेगळी आहे आणि लोक ती समजून घेत असल्याचे लॉकडाऊनच्या काळात दिसले आहे. सरकारने या काळात बरीच बंधने आणली पण लोकांनी सहकार्यच केले आहे असे मत व्यक्त केले. बहुतेक सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे समर्थन केले.
मंत्रिमंडळाचा हा सूर लक्षात घेता आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता नाही. अर्थात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय ठरते ते महत्त्वाचे असेल. येत्या दोनतीन दिवसात समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. नागपूरचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्या दृष्टीने नागपुरात विधानभवन, रविभवन आदी इमारतींची देखभाल, दुरुस्तीची कामेही सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फारतर एक आठवडा होईल असे बोलले जात होते पण आता अधिवेशन नागपुरात होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.