"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:01 PM2021-04-02T17:01:27+5:302021-04-02T17:11:40+5:30
Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले.
यवतमाळ : आम्ही राज्य सरकारमध्ये सामील असलो, तरी जनहिताच्या मुद्द्यावर आंदोलन करू. शिक्षण क्षेत्रात दिल्ली सरकारने खूप सुधारणा केली. पाणी, वीज बिलही माफ केले. मोहोल्ला क्लिनिकमधून दिल्लीच्या लोकांना दिलासा मिळाला. दिल्ली सरकार या सुधारणा करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल आमदार अबू असीम आझमी यांनी उपस्थित केला. ("work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned)
ते यवतमाळ येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, मंत्र्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हाच परमबीर सिंग यांनी शरद पवारांना माहिती का दिली नाही? आता बदली झाल्यावर ते का बोलत आहेत? सचिन वाझेंसारखा छोटा अधिकारी वरिष्ठांची मंजुरी असल्याशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. या प्रकरणात चौकशी होत आहे. त्यापूर्वीच गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. त्यांनी तो सध्याच देऊही नये. आम्ही सोबत राहिलो म्हणून सरकार राहील अन् आम्ही विरोधात गेलो म्हणून सरकार पडणारही नाही. परंतु, राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल.
केंद्राच्या कारभाराबाबत आझमी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अंबानी आणि अदानींसाठी काम करीत आहेत. हम दो हमारे दो हीच त्यांची नीती आहे. त्यांनी देश आर्थिकदृष्ट्या बरबाद केला आहे. १५ टक्के मुस्लीमांकडे बोट दाखवून ८५ टक्के हिंदूंना घाबरविले जात आहे. मात्र रेल्वेचे खासगीकरण झाल्यास नुकसान मुस्लीमांचे अधिक होणार की हिंदू कर्मचाऱ्यांचे? म्हणूनच ८५ टक्के लोकसंख्येने आता मोदी सरकारविरुद्ध जागृत झाले पाहिजे, असे आवाहनही आझमी यांनी केले. नव्या शिक्षण धोरणातूनही समाजाची विभागणी करण्याचेच काम होणार आहे. श्रीमंतांचा मुला जादा पैसे भरून शिकेल, पण गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळणेही कठीण होणार आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने इतर बाबींवरील खर्च कमी करून शिक्षणावर जादा खर्च करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी नोंदविली.
आता लॉकडाऊन नकोच
मागच्या वेळी लॉकडाऊन झाला, तेव्हा अनेक समाजसेवक पुढे आले. त्यांनी गरजूंना अन्नपाणी वाटप केले. मात्र आता तेही थकले आहेत. आता जर लाॅकडाऊन झाले, तर लोक कोरोनापेक्षा भूक आणि बेकारीमुळे मरतील. त्यामुळे सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ नये. घ्यायचाच असेल, तर आधी गरिबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आमदार अबू असीम आझमी यांनी केली.
(CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी)