"प. बंगालमध्ये काश्मीरपेक्षा वाईट स्थिती", भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By मोरेश्वर येरम | Published: December 15, 2020 02:45 PM2020-12-15T14:45:48+5:302020-12-15T14:53:52+5:30
राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय.
नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडुकीसाठीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्यात यावी असं भाजपचं म्हणणं आहे.
पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ही काश्मीरपेक्षाही वाईट आहे, असं विधान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे भाजपचे आमदार सब्यासाची दत्ता यांनी केलं आहे.
भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. यात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे.
>> जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून पश्चिम बंगाल पोलीस पक्षपात करत आहे.
>> पश्चिम बंगाल पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं काम करत आहेत.
>> राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाची नियुक्ती केली जावी.
>> राज्य सरकारी कर्मचारीच बैठका घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत आहेत. मग निवडणूक नि:पक्षपातीपणे कशी होईल?
>> पश्चिम बंगालमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करावी.
अशा तक्रारी आणि मागण्या भाजपने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.
भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग देखील सक्रीय झालं असून १७ डिसेंबर रोजी आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी ते करणार आहेत.