एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला
By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 04:58 PM2020-11-29T16:58:26+5:302020-11-29T17:04:25+5:30
Amit Shah News : ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले.
हैदराबाद - ग्रेटर हैदराबाद विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हैदराबादमध्ये शक्तिप्रदर्शन केले. तसेच हैदराबादमधील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनाही अमित शाहा यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले. तसेच घुसखोरांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष गोंधळ घालायला सुरुवात करतात, असेही अमित शाह म्हणाले.
रोहिंग्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, ओवेसींनी एकदा लिहून द्यावे की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढा म्हणून. त्यानंतर मी काहीतरी करतो. मात्र आम्ही जेव्हा कायदा करतो तेव्हा हे लोक संसदेमध्ये गोंधळ घालतात. काही दिवसांपूर्वी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून ओवेसींनी अमित शाहांना टोला लगावला होता. जर हैदराबादमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत असतील तर अमित शाह कारवाई का करत नाहीत. ओवेसींच्या याच टिप्पणीलाअमित शाहांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हैदराबादमध्ये महानगरपालिका निवडणूक जिंकून तेलंगाणामध्ये राजकीय आघाडी घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. गृहमंत्री अमित शाहा यांनी आज रोड शो करून या निवडणुकीत भाजपाच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच रोड शो पूर्वी अमित शाहा यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली. रोड शो आटोपल्यानंतर अमित शाहा यांनी हैदराबादच्या निवडणुकीत भाजपा बहुमत मिळेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
हैदराबादच्या महानगरपालिकेच्या १५० जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमित शाहा यांनी या निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो केला.