यादव-मुस्लिमांचे मसिहा - मुलायम सिंह यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:59 AM2019-04-19T04:59:01+5:302019-04-19T04:59:23+5:30

जातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही.

Yadav-Muslim masahah - Mulayam Singh Yadav | यादव-मुस्लिमांचे मसिहा - मुलायम सिंह यादव

यादव-मुस्लिमांचे मसिहा - मुलायम सिंह यादव

Next

- संजीव साबडे
जातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही. ते कायम भाजपच्या विरोधात राहिले आणि १९९0 साली अयोध्येत जमलेल्या कारसेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांच्यावर हिंदूविरोधी व मुस्लिमांचे तारणहार असे शिक्केही बसले.
भारतात उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल यांचे एकत्र येणे, याचा अर्थ यादव, मुस्लीम, दलित, वाल्मीकी व जाट यांनी एकत्र येण्यासारखे मानले जाते. समाजवादी पक्षाची सारी सूत्रे आता अखिलेश यादव यांच्याकडे असली तरी त्या पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आहेत. उत्तर प्रदेशातील यादव व मुस्लीम यांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. राज्यात यादव समाज ९ टक्के व मुस्लीम समाज १९.३ टक्के आहे. म्हणजे सुमारे २८ टक्के मतांच्या आधारे ते आतापर्यंत निवडणुका लढवत राहिले. पण त्याशिवाय त्यांना यादव वगळता ३५ टक्के ओबीसींचाही पाठिेंबा मिळत राहिला. त्यामुळे त्यांनी तीनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आणि केंद्रात संरक्षणमंत्री म्हणूनही काही काळ काम केले. त्यांचे पुत्र अखिलेशही सलग पाच वर्षे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी राहिले.
नावाने मुलायम असलेला हा नेता आता सुमारे ८0 वर्षांचा असला आणि पक्षाची सारी सूत्रे मुलाकडे गेली असली तरी तो एके काळी अतिशय कणखर नेता म्हणून ओळखला जात असे. डॉ. राम मनोहर लोहिया व १९७७ साली इंदिरा गांधी यांना पराभूत करणारे राज नारायण या समाजवादी नेत्यांच्या व नंतर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पठडीत तयार झालेल्या मुलायम यांनी कायमच राज्यात ओबीसी व यादव यांचे राजकारण केले. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण, उच्च जाती व मुस्लीम (एकूण मते ३५ टक्के) यांच्या मतांच्या आधारे उत्तर प्रदेशची व देशाची सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसकडून त्यांनी मुस्लिमांना आपल्याकडे खेचले आणि त्यातूनच त्यांनी राज्यात दबदबा निर्माण केला.
जातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही. ते कायम भाजपच्या विरोधात राहिले आणि १९९0 साली अयोध्येत जमलेल्या कारसेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांच्यावर हिंदूविरोधी व मुस्लिमांचे तारणहार असे शिक्केही बसले. पण त्याला उत्तर न देता, ते आपले काम करीत राहिले. कमंडल (भाजपचे हिंदू राजकारण) विरुद्ध मंडल (मंडल आयोग) मध्ये ते मंडलच्या बाजूनेच राहिले. पण त्यांना उत्तर प्रदेशाबाहेर कधीच आपले स्थान निर्माण करता आले नाही. त्यामुळे ते आणि त्यांनी १९९१ साली स्थापन केलेला समाजवादी पक्ष हे प्रादेशिक नेते व पक्ष बनून राहिले.
पण सर्व प्रादेशिक पक्षांप्रमाणेच समाजवादी पक्षही यादव घराण्याचा पक्ष बनला. त्यांचे दोन्ही बंधू राम गोपाल यादव व शिवपाल यादव पक्षाचे सरचिटणीस बनले. शिवपाल यांचे अखिलेशशी न पटल्याने त्यांनी आता प्रगतीशील समाजवादी पक्ष स्थापन केला आहे. मुलायम यांचा मुलगा अखिलेश, त्याची पत्नी डिंपल हेही पक्षाचे नेते बनले. लालुप्रसाद व मुलायम दोघेही यादवांचे नेते आणि दोघांनीही पक्ष व सत्ता घरातील मंडळींकडेच सोपवली आहे.
पण २0१४ च्या मोदी लाटेत मुलायम सिंहांची ओबीसी व्होट बँक फुटली. ती भाजपकडे गेली. मायावती यांची बसपची दलित व्होट बँकही फुटून भाजपकडे गेली. अजित सिंह यांची जाट व्होट बँकही रालोदकडून भाजपच्या खिशात गेली. थोडक्यात भाजपने मोदी लाटेत उत्तर प्रदेशच्या दलित, ओबीसी व्होट बँका फोडल्या. मुस्लिमांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष व काँग्रेस यांना मते दिली. पण त्याआधारे यापैकी कोणत्याच पक्षाला मोठा विजय मिळवणे शक्य नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांतही झाली.
त्यामुळे जाट, दलित, वाल्मीकी, यादव व ओबीसी, मुस्लीम (सप, बसप, रालोद, काँग्रेस) यांनी एकत्र येऊ न २0१८ साली पोटनिवडणुका लढवल्या आणि भाजपला पराभूतही केले. त्यामुळेच आता भाजपच्या विरोधात काँग्रेस वगळता हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. निवडणुकांचे निकाल काय लागतात, यावर मुलायम सिंह यांची व्होट बँक शाबूत आहे का, हे स्पष्ट होईल. ते अद्याप यादव व मुस्लिमांचे मसिहा आहेत का, हे निकालांतून समजेल
उद्याच्या अंकात : महाराष्ट्रवादी गोयंकारांचा पक्ष

Web Title: Yadav-Muslim masahah - Mulayam Singh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.