बिहारमधील यादवांचा पक्ष; नाव मात्र राष्ट्रीय जनता दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:53 AM2019-04-17T05:53:33+5:302019-04-17T05:53:48+5:30

लालूप्रसाद यांनी राम विलास पासवान, नितीश कुमार यांच्याप्रमाणे कधीही भाजपशी समझोता केला नाही.

Yadav's party in Bihar; The name is only the Rashtriya Janata Dal | बिहारमधील यादवांचा पक्ष; नाव मात्र राष्ट्रीय जनता दल

बिहारमधील यादवांचा पक्ष; नाव मात्र राष्ट्रीय जनता दल

Next

- संजीव साबडे
लालूप्रसाद यांनी राम विलास पासवान, नितीश कुमार यांच्याप्रमाणे कधीही भाजपशी समझोता केला नाही. या दोघांनी वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्रिपदे मिळविली होती, पण लालूंनी ते केले नाही. त्यामुळेच त्यांना बिहारमधील पाया मजबूत होत गेला.
व्ही. पी. सिंग यांनी भाजपच्या राम मंदिर चळवळीला उत्तर देण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेताच, उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी दंगली झाल्या, आंदोलने झाली. ही आंदोलने अर्थातच उच्च जातींच्या लोकांनी केली होती. ओबीसींसाठी आरक्षण त्यांना मान्य नव्हते. एकीकडे उच्च जाती एकत्र होत असतानाच, आरक्षणानंतर ओबीसींमधील जातीही विविध संघटनांच्या नावे एकत्र येऊ लागल्या. त्यांना शैक्षणिक व सरकारी नोकऱ्यांत आरक्षणच नव्हे, तर सत्तेतही सहभाग हवा होता. वास्तविक बिहारमध्ये ओबीसी समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊ न गेले होते, पण जवळपास सर्वच पक्षांवर पगडा मात्र उच्च जातींचाच होता. जातीची समीकरणे बसविताना ओबीसीमधील नेते मंत्री, मुख्यमंत्री झाले, पण ते त्या-त्या समाजाचे नेते मात्र नव्हते.
जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाला बिहार व गुजरातमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. लालूप्रसाद यादव, राम विलास पासवान, नितीश कुमार ही सारी मंडळी या आंदोलनातून पुढे आली. लालूप्रसाद पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. तेथून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आणि कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. पुढे १९७७ साली ते जनता पार्टीमध्ये आल. वयाच्या २९व्या वर्षी ते लोकसभेवर निवडूनही गेले.ते १९८0 ते १९८९ या काळात विधानसभेत होते. जनता दलाची स्थापना होताच ते त्या पक्षासमवेत राहिले. मुख्यमंत्री झाले.
राम मंदिरासाठी अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा बिहारमध्ये अडविण्याचे धारिष्ट्य लालूप्रसाद यांनी दाखवून, आपणच खरे धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवून दिले, पण भाजपने व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढला. लालूप्रसादांनी ओबीसी, दलित, मुस्लीम यांच्या पाठिेंब्याने सरकार चालविले. लालूप्रसाद दोनदा मुख्यमंत्री व तीनदा केंद्रात मंत्री राहिले. त्यांनी १९९७ मध्ये स्वत:चा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष स्थापन केला. तो बिहारमधील यादवांचा पक्ष आहे. अर्थात, काही मागास जाती व मुस्लीम समाज त्यांच्यासमवेत आहेत.
बिहारमध्ये मागास जातींचे प्रमाण सुमारे ५१ टक्के आहे. त्यापैकी यादव समाज १४ टक्क्यांवर आहे, तर मुस्लिमांचे प्रमाण आहे १७ टक्के. म्हणजेच ३१ टक्के मते या दोन समाजांची, पण सत्ता डोक्यात गेली की काय होते, त्याचे लालूप्रसाद यादव हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. कोट्यवधींच्या चारा घोटाळ्यामुळे ते आजही तुरुंगात आहेत. ग्रामीण शैलीत बोलून त्यांनी मतदार पक्का केला, बंगल्यात गायी व म्हशी आणून बांधल्या, सरकारी निवासस्थानी होळी व छठ पूजा मांडली, पण नंतर शहरी मंडळींना लालूप्रसाद विदूषक वाटू लागले. आपण व आपले कुटुंब या पलीकडे त्यांनी पाहिले नाही. आपल्या पश्चात त्यांनी पत्नी राबडीदेवी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले. लहान मुलगा तेजस्वी याला उपमुख्यमंत्री करण्यास भाग पाडले. तेजप्रतापला मंत्री केले.
पण लालुप्रसाद यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र कधीही तडजोड केली नाही. त्यांनी राम विलास पासवान, नितीश कुमार यांच्याप्रमाणे कधीही भाजपशी समझोता केला नाही. या दोघांनी वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्रिपदे मिळविली, पण लालूंनी ते केले नाही. त्यामुळेच त्यांना बिहारमधील पाया मजबूत होत गेला. हा एकच नेता भाजपशी लढतो, अशी स्वत:ची प्रतिमा तयार करून घेण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे गेल्या विधानसभेत त्यांनी काँग्रेस व नितीश कुमार यांच्याशी आघाडी करून बिहारमध्ये भाजपला सत्तेबाहेर ठेवले. सर्वाधिक जागा राजदला मिळाल्या, पण नितीशना मुख्यमंत्री केले. मात्र नितीश कुमार यांनी काँग्रेस व लालूंना दूर करून पुन्हा भाजपशी जवळीक केली.
आताच्या निवडणुकांतही राजद व काँग्रेस व अन्य लहान पक्ष एकत्र आहेत. नितीश व भाजप दुसºया बाजूला आहेत. तीन वर्षांपूर्वी भाजपला पराभूत करणारा लालूप्रसादांचा राष्ट्रीय म्हणवणारा प्रादेशिक पक्ष ते तुरुंगात असताना यंदा कितपत प्रभाव पाडतो, हे पाहायला हवे.
उद्याच्या अंकात : उत्तर प्रदेशातील ‘मुलायम’ राजकारण

Web Title: Yadav's party in Bihar; The name is only the Rashtriya Janata Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.