राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:54 PM2021-01-29T14:54:22+5:302021-01-29T15:09:05+5:30
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेकडून त्यासाठीचं नियोजन देखील सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलंय.
"राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?
दरम्यान, याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर महाआरती देखील केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानं शिवसेनेनं तिथं राम मंदिराच्या आंदोलनात ऊर्जा भरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं, तरी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे. अयोध्येत मंदिर कुठं आहे. रामलल्ला कुठं आहेत. कोणकोणती मंदिरं आहेत. शरयूच्या काठावर कसं जायचं अशा गोष्टींचं आम्ही नक्की त्यांना मार्गदर्शन करू", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन संपवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारकडून बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. "गेले दोन महिने शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. त्यांना देशभर सहानुभुती देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा नष्ट करण्यासाठीच आंदोलनाला बदनाम करण्याचा कट भाजपने रचला आहे. लालकिल्ल्यावर धुडगूस घालणारे भाजपवालेच होते हे आता व्हिडिओंतून समोर येऊ लागलं आहे", असं संजय राऊत म्हणाले.