"होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे", आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 06:40 PM2020-10-13T18:40:27+5:302020-10-13T18:51:06+5:30
Ashish Shelar News : उद्धव ठाकरेंना आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून तुम्ही केव्हाच फारकत घेतली आहे.
मुंबई - आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे राज्यपाल महोदयांना सांगणाऱ्या शिवसेनेला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा डिवचले असून, होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे, असे प्रत्युत्तर आमदार शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महोदय, आपल्याला आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून तुम्ही केव्हाच फारकत घेतली आहे. प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही, या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे. हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आहात. तुम्हाला हेही नाकारता येणार नाही की, कसाबला बिर्याणी खायला घातली त्यांच्याशी तुम्ही संगनमत केले आहे, आणि तुम्हाला हे नाकारता येणार नाही ज्यावेळी पंढरपूरला पुजेला गेलात त्यावेळी आमच्या विठूरायाच्या चरणाला स्पर्श ही केला नाहीत. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज आहे. तुमचे हिंदुत्वाची भेसळ झालेय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शेलार यांनी ट्विट करूनही टीका केली होती. हे कसले सत्तेचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.
राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंनी दिले होते खरमरीत उत्तर
महोदय, आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिली होती.