तुमचा अली, तर आमचा बजरंगबली- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:07 PM2019-04-09T15:07:42+5:302019-04-09T16:24:41+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले आहेत.
#WATCH UP Chief Minister Yogi Adityanath at a public rally in Meerut, says, "Agar Congress, SP, BSP ko 'Ali' par vishwaas hai toh humein bhi 'Bajrangbali' par vishwaas hai." pic.twitter.com/ZwI3L5ZEFt
— ANI UP (@ANINewsUP) April 9, 2019
तसेच दलित आणि मुस्लिम कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण फाळणीदरम्यान दलितांबरोबर पाकिस्ताननं कशा पद्धतीचा व्यवहार केला आहे, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे दलित नेते झाले. परंतु योगेश मंडल फाळणीदरम्यान पाकिस्तानात गेले होते. योगेश मंडल यांनी पाकिस्तानात दलितांवर होत असलेला अत्याचार पाहिल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. महागठबंधननं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आता उर्वरित समाजानं विचार करायला हवा की, कोणाला मतदान करायचं. उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागात मुस्लिम-दलितांची मतं भाजपाला मिळतील, अशीही आशाही योगींनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अमेठी सोडून वायनाडला जाण्याचं कारण हे मुस्लिम मतं आहेत. योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही मुस्लिम लीग आणि काँग्रेसवर टीका केलेली आहे.