भाजपाला विद्यमान खासदारांवर भरोसा नाही, योगींचे मंत्री उतरणार लोकसभेच्या मैदानात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:41 AM2019-03-12T09:41:21+5:302019-03-12T09:41:58+5:30
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. मतदानाची तारीख जाहीर झाल्यापासून आता पक्षांनी कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे, यावर लक्ष केंद्रित केलं आहे. सर्वच पक्षांच्या यासंदर्भात बैठकांवर बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधननं भाजपाच्या डोकेदुखीत वाढ केली आहे.
विरोधकांची एकजूट पाहता भाजपाही एक नवी रणनीती आखण्याचा तयारीत आहे. सर्वाधिक लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाच्या दोन डझनांहून अधिक खासदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. या विद्यमान खासदारांच्या जागी योगी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं भाजपाच्या विचाराधीन आहे. भाजपानं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये मोदी लाटेत जिंकलेल्या अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील जनता पसंत करत नसल्याचं समोर आलं आहे. त्याच ज्या खासदारांबाबत मतदारसंघात असंतोषाचं वातावरण आहे. तसेच जे खासदार त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय नाही. त्यांना पुन्हा तिकीट न देण्यासंदर्भातही भाजपानं जवळपास निश्चित केलं आहे.
योगींचे मंत्री लढणार लोकसभा निवडणूक
भाजपा योगी सरकारमधील 10 ते 12 मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, बृजेश पाठक, स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, एसपी सिंह बघेरसह अनेक नावांचा या यादीत समावेश आहे. येत्या दोन-तीन दिवसांत भाजपा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा करणार आहे.
भाजपानं केले अंतर्गत सर्व्हे
भाजपानं लोकसभा निवडणुकीसंदर्भात अंतर्गत सर्व्हे केला आहे. विशेष म्हणजे संघानंही अशाच प्रकारचा एक सर्व्हे केला असून, खासदारांची मतदारसंघातील कामे, त्यांचा प्रभाव यासंदर्भात एक अहवालही तयार केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तो अहवालही सोपवण्यात आला आहे.