वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:47 AM2019-04-14T03:47:38+5:302019-04-14T06:59:19+5:30

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले.

 YSR Congress exam in Andhra Pradesh! | वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

Next

- संजीव साबडे

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला. त्यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला.
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला यंदा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने तगडे आव्हान दिल्याची चर्चा आहे. तेथील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून खरे चित्र स्पष्ट होईलच, पण चंद्राबाबू व त्यांच्या पक्षाच्या झालेल्या लोकप्रियतेचा फायदा मिळवू शकणारा आंध्रात सध्या एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे वायएसआर काँग्रेस. आजही वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार आहे. गेल्या लोकसभेत आठ सदस्य होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास मोदी सरकार तयार नसल्याच्या निषेधार्थ या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत.
एके काळी बालेकिल्ला असलेल्या आंध्रातील सत्ता काँग्रेसने स्वत:च्या कारवायांमुळे घालवली. ती गेली तेलगू देसमकडे, पण वायएस राजशेखर रेड्डी यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात कर्तृत्ववान नेता मिळाला आणि त्यामुळे राज्याची सत्ताही पुन्हा मिळवता आली. वायएसआर आंध्रचे मुख्यमंत्री झाले. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. ते अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात.
पण २00९ साली त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने राज्यातील १२२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला. वायएसआर यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला, पण दिल्लीतील नेत्यांची त्यास तयारी नव्हती. आत्महत्या केलेल्या लोकांच्या कुुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी जगन मोहन यांनी यात्रा काढली. काँग्रेसने के. रोसय्या यांच्याकडे मुख्यमंत्री दिले, जगन मोहन यांच्या काकांना मंत्रिमंडळात घेतले. अंजय्या यांचा अपमान हा जसा काँग्रेसचा चुकीचा निर्णय होता, तसेच यंदाही झाले. लोकप्रिय नेत्याच्या मुलाला डावलल्याची भावना राज्यात निर्माण झाली. काँग्रेसचे अनेक नेते व आमदारही जगन मोहन यांच्या बाजूला गेले. त्या सर्वांनी मिळून २0११ साली वायएसआर काँग्रेसची स्थापना केली.
आता तेलंगणाप्रमाणे आंध्र प्रदेशातही काँग्रेसची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस असाच सामना आहे. वायएसआर काँग्रेसची स्वत:ची अशी विचारसरणी नाही. तेलगू भाषिक व राज्याची अस्मिता यांचे हित एवढाच पक्षाचा अजेंडा आहे. जगन मोहन काँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला. वायएसआर अतिशय लोकप्रिय नेते होते, हे खरे असले, तरी त्यांनी सत्तेत असताना प्रचंड माया निर्माण केली होती. ती आपल्याकडे ठेवण्याचा जगन मोहन रेड्डी यांचा प्रयत्न होता. या रकमेचा हिशेब देणेही शक्य नव्हते. या साऱ्या प्रकरणांत त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. तरीही प्रकरणांचा निकाल लागायचाच आहे.
अर्थात, त्यामुळे जगन मोहन रेड्डी खचले नाहीत. बाहेर आल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले. गेल्या विधानसभा निवडणुकांत नवा पक्ष व चौकशांचा ससेमिरा यांमुळे ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण ते बळ आपल्यात आहे, असे त्यांनी दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला, पण आतापर्यंतचे जगन मोहन यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना, चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला आहे. वायएसआर काँग्रेस वा जगन मोहन रेड्डी यांची काँग्रेसशी असलेली नाळ अद्याप तुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते प्रसंगी काँग्रेसशी समझोता करू शकतात. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे, पण काँग्रेसने आतापर्यंत आंध्रात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी.
चंद्राबाबू नायडू यांची लोकप्रियता कमी होत आहे, आंध्र प्रदेशामध्ये प्रस्थापितांविरुद्ध खूप नाराजी आहे, असे बोलले जाते, पण काँग्रेस वा भाजप त्या बाबींचा फायदा उठवू शकत नाही. तशी ताकद असलीच, तरी ती केवळ वायएसआर काँग्रेस व जगन मोहन रेड्डी यांच्यातच आहे. यंदा राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होणार आहेत. काही मतदारसंघात मतदान झालेलेच आहे. चौरंगी लढतीत काय होईल, हे सांगणे अवघड असते. त्यामुळे वायएसआर काँग्रेसची यंदा राज्यात परीक्षाच आहे. या परीक्षेत ते बाजी मारतात की चंद्राबाबूंचा क्रमांक कसाबसा का होईना, पहिला राहतो, हे पाहायला मिळेल.
उद्याच्या अंकात ।
बंगाली दीदींचा तृणमूल काँग्रेस

Web Title:  YSR Congress exam in Andhra Pradesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.