१ ते १ लाख ७१२ हजार...कोरोनाने दिला पुण्याला ऐतिहासिक धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:44+5:302020-12-09T04:09:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्लेगच्या साथीनंतर साधारणत: शतकानंतर सर्वात मोठ्या साथीच्या आजाराला कोरोनाच्या रूपाने पुणे शहर सामोरे गेले़ ...

1 to 1 lakh 712 thousand ... Corona gave a historical lesson to Pune | १ ते १ लाख ७१२ हजार...कोरोनाने दिला पुण्याला ऐतिहासिक धडा

१ ते १ लाख ७१२ हजार...कोरोनाने दिला पुण्याला ऐतिहासिक धडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्लेगच्या साथीनंतर साधारणत: शतकानंतर सर्वात मोठ्या साथीच्या आजाराला कोरोनाच्या रूपाने पुणे शहर सामोरे गेले़ ९ मार्च, २०२० ला जीवंधर औटी ही पहिली कोरोनाबाधित व्यक्ती शहरात आढळून आली आणि नऊ महिन्यानंतर शहरात १ लाख ७२ हजार ५५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली़ नऊ महिन्याच्या काळात अनेक चढउताराअंती आज कुठेही हा संसर्ग अटोक्यात येताना दिसत असून, कोरोना आपत्तीने मात्र साथरोग आजाराच्या आपत्ती व्यवस्थापनाचा चांगलाच धडा पुणे महापालिकेसह संपूर्ण शहराला दिला़

शहरातील कचरा निवारण, औषध फवारणी करणे आदी कामांसह पोलिओ सारख्या आजारांच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या ज्या आरोग्य विभागाची ओळख होती़ तो आरोग्य विभाग कोरोना आपत्तीच्या नऊ महिन्याच्या काळात मनुष्यबळ, वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधोपचार, वैद्यकीय सेवा यासर्व माध्यमातून सर्वंकष परिपूर्ण होऊ लागला आहे.

महापालिकेचा आरोग्य विभागाच नव्हे तर इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या आपत्तीत सामुहिक जबाबदारी पार पाडली़ आपत्ती काळात महापालिकेचा आरोग्य विभाग विशेषत: सर्वाधिक टिकेचा धनीही ठरला़ रूग्णालये सक्षम नाहीत, आरोग्य सेवकांची कमतरता, रूग्णालयातील यंत्रसामुग्रीचा तुटवडा, वेळेवर औषधोपचार नाही आदी समस्या पुढे आल्या़ यात बदल होत गेला आणि सुमारे अडीचशे कोटी रूपये कधी नव्हे ते महापालिकेच्या इतिहासात केवळ एका रोगाच्या आपत्तीवर खर्च करण्यात आले.

चौकट

शंभर वर्षांनी आला योग

प्लेगच्या साथीच्या वेळी उभारण्यात आलेले व आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेले महापालिकेचे (तेव्हाच्या नगरपालिकेकडून) नायडू सांसर्गिक रूग्णालय हे तब्बल शंभर वर्षांनंतर कोरोना आपत्तीमुळे आयसीयू खाटांसह सक्षम झाले़ याचबरोबर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधित व संशयित रूग्णांसाठी ३० ठिकाणी कोविड सेंटर तथा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारून १८ हजार खाटांची उपलब्धता करण्यात आली़

चौकट

आजवर शहरातील १ लाख ७२ हजार ५५९ कोरोनाबाधितांपैकी १ लाख ६२ हजार ९५९ जण कोरोनामुक्त झाले. ज्या शहराची ओळख देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधितांच्या शहरांमध्ये होती त्याच पुण्याचा ‘रिकव्हरी रेट’ आजमितीला ९२़१७ टक्के आहे़ सप्टेंबरच्या मध्यात पुण्यात दिवसाला हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित आढळत होते. आता हा आलेख उतरता झाला असून, ८ डिसेंबरला शहरात २७९ कोरोनाबाधितांची वाढ झाली. आजमितीला सक्रिय रूग्णसंख्या फक्त ५ हजार ७० आहे़

Web Title: 1 to 1 lakh 712 thousand ... Corona gave a historical lesson to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.