तोडफोड करणाऱ्या १९२ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:59 AM2018-08-11T00:59:36+5:302018-08-11T00:59:53+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटक आरोपींपैकी ५८ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काहींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाºया आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक झाली. तर डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी पीएमपी बस तसेच काही
दुकानांवर दगडफेक केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून १९२ जणांना अटक करण्यात आली.
वारजे पोलिसांनी अटक केलेल्या ३० जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या २१ जणांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.
कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या ५५ जणांपैकी, ५० जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाच जणांनी त्यांना मारहाण झाल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. चांदनी चौक पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणी ८ जणांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पुणे जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने जाहीर केल्याप्रमाणे मराठा आंदोलनाच्या केसेस मोफत लढविण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवारी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, अॅड. समीर घाटगे, उपाध्यक्ष अॅड. भूपेंद्र गोसावी, अॅड. रेखा करंडे, अॅड. योगेश पवार, अॅड. नितीन झंजाड, अॅड. विजय शिंदे आणि अॅड. रवी पवार यांनी आंदोलकांच्यावतीने बाजू मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी ८० जणांना अटक केली होती. त्यातील २ अल्पवयीन होते. त्यामुळे ७८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यात पाच महिलांचा समावेश आहे. या पाच महिलांतर्फे जामीन मिळावा, म्हणून अर्ज करण्यात आला होता. तो कोर्टाने फेटाळला.