अमेरिकेत १ अब्ज डॉलर, येथे पैशाची चणचण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:34 AM2018-10-21T01:34:28+5:302018-10-21T01:34:41+5:30

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे.

 1 billion dollars in the United States, money crunch here | अमेरिकेत १ अब्ज डॉलर, येथे पैशाची चणचण

अमेरिकेत १ अब्ज डॉलर, येथे पैशाची चणचण

Next

पुणे : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणूक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासवगतीने सुरू आहे. अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता एका विषयापुरतीच मर्यादित राहिली आहे. केवळ वरवरचे ज्ञान मिळण्यापलीकडे संशोधनाला फारसा वाव नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पूरक ‘इको सिस्टीम’च नसल्याने शिक्षणासह संशोधन क्षेत्रात त्यासाठी भरीव गुंतवणूक करण्यास कोणीच पुढे येत नाही.
अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधनासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विद्यापीठाकडून तब्बल १ अब्ज डॉलर्सएवढी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच जगभरातील विकसित देश संगणकामध्ये मानवी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही मागील काही वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. पण संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्याला मर्यादा आल्या आहेत. याला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनीही दुजोरा दिला.
ते म्हणाले, की भारतात ८० च्या दशकाच्या शेवटीपासून संगणक क्षेत्रातील संशोधनाला सुरूवात झाली. तर ९० च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम सुरू झाले. सी-डॅक संस्था त्यामध्ये मोठे योगदान देत आहे. पण मानवी बुद्धीला पार करणे कठीण असल्याचे त्यावेळी लक्षात आल्यानंतर संशोधनाची गती मंदावली. गेल्या काही वर्षात संशोधनाला पुन्हा गती मिळाली आहे. अनेक परदेशी कंपन्यांचे संशोधन भारतात सुरू आहे. त्यामध्ये आपलेच अभियंते, तज्ज्ञ अधिक आहेत. आयआयटी, विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. पण निधीअभावी त्याला काही मर्यादा आहेत. तज्ज्ञ असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा, वातावरण नाही. तुलनेने खासगी क्षेत्रात बऱ्यापैकी संशोधन होत आहे.
>अपेक्षित गुंतवणूक, अनुभव नाही
भारतामध्ये संशोधन क्षेत्रात शासनाकडून अमेरिकेच्या तुलनेत ५ टक्केही गुंतवणूक केली जात नाही. खासगी क्षेत्रात मात्र तुलनेने चांगले संशोधन होत आहे. रोबोटिक्समध्ये प्रगती केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना खूप मोठी आहे. त्यासाठी अनुभवी तज्ज्ञही आपल्याकडे पुरेसे नाहीत. त्यासाठी पदवीस्तरापासून स्वतंत्र अभ्यासक्रम करण्याची गरज आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाकडे पर्यायी विषय म्हणून पाहिले जाते. परदेशातील बहुतेक संस्था, विद्यापीठे खासगी आहेत. आपल्याकडे शासनाचे नियंत्रण असल्याने निधी न मिळण्याबरोबरच नियम, धोरणांचा अडसर मोठ्या प्रमाणावर येतो.
- दीपक शिकारपूर,
प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ
नोएडा येथील बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) पुढाकारातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था एकत्रित आल्या आहेत. त्यामध्ये संस्थांमधील तज्ज्ञ, विविध प्रकल्प, प्रयोगशाळा यांची देवाणघेवाण होऊन कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अद्याप हे प्राथमिक स्तरावर आहे. पण आपल्याकडे आता याबाबतीत मोठी प्रगती झालेली दिसते. पण शैक्षणिक संस्थांमध्ये त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. निधीची कमतरता असते. अभियांत्रिकीच्या एकाच शाखेत एक विषय म्हणून याचा समावेश आहे. याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता क्लबही सुरू केला आहे. त्यानुसार विद्यार्थी व प्राध्यापक एकत्रित येऊन विविध प्रकल्पांवर विचारविनिमय करतात.
- डॉ. बी. बी. आहुजा, संचालक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये संगणक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ केवळ एका विषयात सामावलेली आहे. पण काही शैक्षणिक संस्था रोबोटिक्स, मशिन लर्निंग यांसह विविध विषयांत अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी
तर केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमातच हा
विषय होता.
विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक संशोधनासाठी आपल्याकडे आवश्यक ‘इको सिस्टीम’ तयार झालेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळाल्यानंतर त्या क्षमतेचे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगक्षेत्रातही त्याचा पुरेसा वापर असायला हवा.
भारतात असे उद्योग खूप
कमी आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करणे सध्या तरी गरजेचे नाही. आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असली तरी संशोधनाची संस्कृती विकसित झालेली नाही. तेवढ्या क्षमतेच्या प्रयोगशाळा तयार झालेल्या नाहीत. संशोधनामध्ये गुंतवणूक करून पुरेसा परतावा मिळत नाही. त्यामुळे शासनासह उद्योगक्षेत्रही त्यात पैसा गुंतविण्यासाठी पुढे येत नाहीत. प्रगत राष्ट्रांमध्ये याउलट चित्र
आहे.
विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगअंतर्गत रोबोटिक्स अ‍ॅन्ड आॅटोमेशन हा बी. टेक. अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामध्येच कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकला जातो. सध्या ‘चॉईस बेस्ड’ शिक्षण पद्धतीचा काळ आहे. त्यानुसार अभ्यासक्रम सुरू केले जातात. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता यावर संशोधन सुरू आहे. म्हणून प्रत्येक संस्थेने त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या गरजा, रोजगाराच्या संधी ओळखून बदल करणे आवश्यक आहे. तसेच कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची मान्यता व इतर गोष्टींचा अडसर येतो. विद्यापीठाकडे संशोधनासाठी आवश्यक प्रयोगशाळा, तज्ज्ञ उपलब्ध आहेत. पण सध्या तरी ‘चॉईस बेस्ड एज्युकेशन’ला प्राधान्य दिले जात आहे.
- ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दीपक आपटे, कुलसचिव एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

Web Title:  1 billion dollars in the United States, money crunch here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.