स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पुणे विभागात १ कोटी ४० लाख ८७ हजार अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:32+5:302021-07-10T04:08:32+5:30
पुणे : स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पुणे विभागात १९ नवउद्योजकांना १ कोटी ४० लाख ८७ हजार रुपयांचे ...
पुणे : स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पुणे विभागात १९ नवउद्योजकांना १ कोटी ४० लाख ८७ हजार रुपयांचे अनुदान वाटप केल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाळासाहेब सोळंकी यांनी दिली.
केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केलेली आहे. पुणे विभागात या योजनेंतर्गत चालू अर्थिक वर्षात एकूण ५१ नवउद्योजकांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १९ अर्जांची शिफारस केली. त्यानुसार पुणे व सोलापूर जिल्हा वगळता सातारा जिल्ह्यातील ९ अर्जदारांना ५५ लाख २५ हजार, सांगली जिल्ह्यातील ९ अर्जदारांना ७३ लाख ३ हजार, कोल्हापूर जिल्ह्यातील २ अर्जदारांना १२ लाख ५९ हजार रुपये, असे एकूण १९ अर्जदारांना १ कोटी ४० लाख ८७ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णयानुसार निर्णय घेतलेला आहे. त्याअन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील २५ टक्केमधील जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.