बनावट कागदपत्रे देऊन १ कोटी ६८ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:55 AM2023-09-01T10:55:35+5:302023-09-01T10:56:20+5:30
एका सोसायटीत सदनिका खरेदी करत असल्याचे सांगत चार जणांनी एचडीएफसी फायनान्स कंपनीची १ कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे...
पुणे : विमाननगर येथील एका सोसायटीत सदनिका खरेदी करत असल्याचे सांगत चार जणांनी एचडीएफसी फायनान्स कंपनीची १ कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वप्निल सुनील मुळे (४०, रा. एरंडवणे) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रवीणकुमार मेमन, श्रीदेवी प्रवीणकुमार मेनन (दोघेही रा. पिसोळी), संदीप सेवकराम बसतानी (रा. मुंढवा), योगेंद्र रघुनाथ खिस्ते यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली.
प्रवीणकुमार मेमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून सदनिका खरेदी करायची आहे, असे सांगून एचडीएफसी फायनान्स कंपनीकडे एआरके प्रेम इन्फ्रास्ट्रक्चरचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र, डिमांड लेटर, पैसे भरल्याच्या पावत्या तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली यांच्या कार्यालयातील बनावट दस्त सादर करून कंपनीकडून १ कोटी ६७ लाख ७५ हजार गृहकर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी कंपनीची फसवणूक केल्याचे समजताच सुळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कादबाने करत आहेत.