पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दाैऱ्यात मंडपासाठी आला १ कोटी ८५ लाख खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:42 AM2023-10-28T11:42:50+5:302023-10-28T11:54:07+5:30
या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलिस परेड ग्राउंड येथे नागरिकांसाठी मंडप व बैठक व्यवस्था, एस. पी. कॉलेज ग्राउंड येथील मुख्य मंडप व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवली होती...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यासाठी शिवाजीनगर पोलिस परेड ग्राउंड, कृषी महाविद्यालय आणि एस. पी. कॉलेज मैदानावर उभारलेला मंडप, बैठक व्यवस्था यासाठी १ कोटी ८५ लाख १ हजार ४६९ रुपये खर्च झाला असून, त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते, तसेच शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राउंड येथे पुणे महापालिका, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रो यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले हाेते.
या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलिस परेड ग्राउंड येथे नागरिकांसाठी मंडप व बैठक व्यवस्था, एस. पी. कॉलेज ग्राउंड येथील मुख्य मंडप व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवली होती. अत्यंत कमी कालावधीत मंडप उभारायचा असल्याने निविदा न काढता अनुभवी ठेकेदाराकडून हे काम करून घेण्याचे निश्चित केले होते. यासाठी मे. मेराकी इवेन्ट्स यांचे १ कोटी २४ लाख ९२ हजार, बालाजी मंडप डेकोरेटर्सकडून ४९ लाख ८ हजार, सागर येनपुरे यांच्याकडून २ लाख ११ हजार आणि कमलेश जडे यांच्याकडून ८ लाख ८८ हजार रुपयांचे काम करून घेण्यात आले. हा सर्व खर्च १ कोटी ८५ लाख १ हजार ४६९ रुपये झाला आहे. या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.