१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदार डोंगरेंसह पत्रकाराच्या पोलीस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 08:52 PM2019-01-02T20:52:25+5:302019-01-02T20:54:10+5:30
डोंगरे यांना लाच प्रकरणी पकडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी असलेल्या त्यांच्या बंगल्याची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली.
पुणे : वडिलोपार्जित समाईक ईनामी वर्ग शेत जमिनीचे वारस नोंदीचे निकालपत्र देण्यासाठी व तसे फेरफार करून ७-१२ नोंदी घेण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच घेणा-या तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर यांच्या पोलीस कोठडीत ३ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
डोंगरे यांना लाच प्रकरणी पकडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी असलेल्या त्यांच्या बंगल्याची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. त्यात काहीच सापडले नसल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. डोंगरे यांनी खासगी व्यक्ती किसन सोमा बाणेकर (वय ४०, रा़ लवळे, ता़ मुळशी) याच्या हस्ते डोंगरे यांनी ही रक्कम स्वीकारली आहे़ ६३ वर्षीय तक्रारदार यांची लवळे येथे वडिलोपार्जित सामाईक ईनामी ५ एकर शेत जमीन आहे़ ही शेतजमीन त्यांच्या सर्व भाऊ बंदाची फसवणूक करून प्रकाश कृष्णराव शितोळे यांनी परस्पर विकली़. याबाबत त्यांनी वेळोवळी वारस नोंदीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला होता़ या वारसा नोंदीबाबतची फाईल मंत्रालयात गेली होती़ तेथील सचिवाने यातील कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यास मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविली होती़.
तक्रारदारांनी वेळोवेळी याबाबत संपर्क साधून त्यांना निकालपत्र देण्याची विनंती केली़. तेव्हा त्यांनी निकालपत्र देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली़ त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ डिसेंबरला केली होती़. त्याची पडताळणी केल्यानंतर शनिवारी (२९ डिसेंबर) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला़. लवासा रस्त्याजवळील उरवडे गावाजवळील एका कंपनीच्या गेटसमोर बाणेकर याच्यामार्फत १ कोटी रुपये स्वीकारताना डोंगरे यांना पकडण्यात आले़. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का तसेच पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. तर डोंगरे यांनी तपासास सहकार्य केले असून मालमत्तेबाबत सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे. कोठडीची मागणी करताना देण्याचे आलेले मुद्दे देखील जुने आहे. त्यामुळे कोठडीत वाढ करू नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. हर्षद निंभाळकर, अॅड. हेमंत झंजाड आणि अॅड नंदकुमार शिंदे यांनी केला.