फ्लॅटची परस्पर विक्री करून चुलत भावाची १ कोटींची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: January 10, 2024 04:47 PM2024-01-10T16:47:43+5:302024-01-10T16:48:21+5:30
आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे : फ्लॅटची आगाऊ रक्कम घेऊन सुद्धा तो फ्लॅट दुसऱ्याला विकून चुलत भावाची १ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गौरव दिलीप आगरवाल (४०, रा. पुणे विद्यापीठ रस्ता, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अशोक आगरवाल, निधी संतोष आगरवाल, अशोक मनोहर तायल आणि पूजा अशोक तायल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ ते २३ ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या काळात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी गौरव आगरवाल यांचा चुलत भाऊ संतोष आगरवाल आणि निधी आगरवाल यांच्या कस्तुरी एपीटमी या बांधकाम योजनेतील डी बिल्डिंग मध्ये १२ मजल्यावरील फ्लॅट १ कोटी ४० लाखांना घेण्याचे मान्य केले व कबूल करून १ कोटी रुपये दिले. यानंतर संतोष आगरवाल यांनी ही रक्कम स्वीकारून रक्कम प्राप्त झाल्या बाबत पोहोच पावती दिली. तसेच फ्लॅटचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ताबा देताना उर्वरित ५० लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र संतोष आगरवाल यांनी हा फ्लॅट फिर्यादी गौरव आगरवाल यांच्या परस्पर आलोक तायल यांना विकून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) पाटील करत आहेत.