फक्त १ किलोमीटरसाठी १ तास; पाऊस अन् खड्ड्याने पुणेकर हैराण, ट्राफिकमुळे लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:33 PM2024-09-26T14:33:03+5:302024-09-26T14:33:27+5:30
रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूककोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला असून दुचाकी चालकदेखील या कोंडीने बेजार झाले आहेत
पुणे: शहराला बुधवारी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे झालेल्या वाहतूककोंडीने पुणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूककोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला. दुचाकी चालकदेखील या कोंडीने बेजार झाले होते. १ किलो मीटरसाठी १ तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. तसेच, अनेक रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. रात्री ९ नंंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली होती.
बुधवारी (दि. २५) दुपारी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शिवाजीनगर, डेक्कन, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, खडकी, रेंज हिल्स, नगर रस्ता, कॅम्प परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच, अनेक ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यात पावसाने भर घातली. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता. यामुळे बुधवारी अनेकजण कार घेऊन बाहेर पडले होते. सायंकाळी कार्यालय सुटण्याची वेळ आणि पावसाची वेळ एकच झाल्याने वाहतूककोंडीत भर पडली. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडाला होता.
वाहने तासंतास एकाच ठिकाणी थांबून...
पुण्याच्या मुख्य रस्त्यांसह सिंहगड रोड, सातारा रोड, नगर रोड, सोलापूर रोड, विद्यापीठ परिसर, शिवाजीनगर, डेक्कन, कर्वे रस्ता, कोथरूड परिसर या परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. वाहने तासंतास एकाच ठिकाणी थांबून राहिली होती.