इंदापूरला बंद हॉटेलमधून रोख रकमेसह १ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:28 AM2017-10-20T02:28:30+5:302017-10-20T02:28:45+5:30
बंद हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या आरोपावरून बापलेकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. १७) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदापूर : बंद हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या आरोपावरून बापलेकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. १७) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत शिंदे, राहुल शिंदे (दोघे रा. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गोविंद संजू शेरिगर (वय ६० वर्षे, रा. पिसेवाडा, खडकपुरा, इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. दि. १७ आॅक्टोबर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शेरिगर हे गेल्या चाळीस वर्षांपासून इंदापूरला राहात आहेत. इंदापूर एसटी बसस्थानकासमोर मारुती मंदिर ट्रस्टच्या जागेत ट्रस्टला भाडे देऊन हॉटेल चालवत आहेत. त्यासाठी त्यांनी रीतसर हॉटेलचा परवाना, वीज व नगर परिषदेचे पाण्याचे कनेक्शन घेतलेले आहे, असे असताना भागवत शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे या दोघांनी २० ते २५ जण जमवून दि. १० डिसेंबर २०१६ रोजी फिर्यादीच्या हॉटेलच्या चहूबाजूने व वरून पत्र्याचे शेड उभारून हॉटेल बंद करून टाकले. फिर्यादी व त्याच्या पत्नीस हाकलून दिले. या संदर्भात पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. हॉटेल व्यवसाय चालू करता येत नसल्याने उपासमारीची वेळ आली.
पोलीस खात्यातील वरिष्ठांकडे दाद मागून ही उपयोग झाला नाही. अखेरचा उपाय म्हणून फिर्यादीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या पार्श्वभूमीवर दि. १७ आॅक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला समजले की, त्याच दिवशी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी व इतरांनी हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून हॉटेलमधील सामान व रोख रक्कम चोरून नेली आहे. त्यामुळे फिर्यादीने त्या ठिकाणी जाऊन खात्री करून घेतली असता, ७५ हजार रुपयांचे लाकडाचे सहा टेबल्स, दहा खुर्च्या, हॉटेलचे दोन शटर, आठ हजार रुपयांची स्वयंपाकाची भांडी, दहा हजार रुपयांचे लाकडी काऊंटर, त्यामधील पंधरा हजार रुपयांची रोकड, एक तोळे वजनाची तीस हजार रुपयांची सोन्याची अंगठी असे १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज त्या ठिकाणी दिसून आला नाही.