कुटुंबातील ४ रूग्णांना बेड मिळवून देण्याच्या नावाखाली उकळले १ लाख ८० हजार, काही दिवसातच त्यापैकी तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:07 AM2021-05-18T11:07:01+5:302021-05-18T11:24:47+5:30
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील घटना, कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल
पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहराप्रमाणेच गावातही उपचारसाठी बेड मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे बेड मिळवून देण्याच्या नावाखाली एका कर्मचाऱ्याने वैयक्तिक १ लाख ८० हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळे येथील दक्ष नागरिकांमुळे हा उघडकीस आला असून संबंधित कर्मचा-या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याचे सिन्नर येथील सचिन प्रभाकर इंगळे यांची आई व दोन भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना त्रास होऊ लागल्याने तेथील एका डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आर. व्ही सेंटरमध्ये उपचारासाठी २३ एप्रिलला दाखल झाले. त्यानंतर रूग्णांची अधिक तपासणी केल्यावर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असलेल्या रूग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगितले. बेड उपलब्ध न झाल्याने सचिन इंगळे यांनी नातेवाईकांच्या मदतीने आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मसीट म्हणून काम करणाऱ्या अमोल बुधा पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथील हाॅस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देतो. मला प्रत्येक बेडप्रमाणे ४५ हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले.
अमोल पवार यांनी त्यांना २४ एप्रिलला बेड उपलब्ध करून दिले. त्यानंतर पवार यांनी इंगळे यांच्याशी संपर्क साधून १ लाख ८० हजार रुपये पाठवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान यानंतर काही दिवसांतच सचिन इंगळे यांचे दोन भाऊ व आई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
सचिन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अमोल बुधा पवार यांच्या विरोधात कोरोना काळात बेड मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला करत संबंधिताला ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश डौले अधिक तपास करत आहेत.