कोरोनाबाधिताला बेड देण्यासाठी मागितले १ लाख ८० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:20+5:302021-05-18T04:12:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळेफाटा : एकाच कुटुंबातील चार कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेड मिळवून देण्याच्या नावाखाली आळे (ता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळेफाटा : एकाच कुटुंबातील चार कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेड मिळवून देण्याच्या नावाखाली आळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने वैयक्तिक १ लाख ८० हजार रुपये घेत त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात बेड मिळवून दिले. हा धक्कादायक प्रकार आळे येथील दक्ष नागरिकांमुळे उघडकीस आला असून, संबंधित कर्मचाऱ्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बुधा पवार असे फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार: नाशिक जिल्ह्याचे सिन्नर येथील सचिन प्रभाकर इंगळे यांची आई व दोन भाऊ यांना कोरोनाची लक्षणे असल्याने व त्यांना त्रास होऊ लागल्याने तेथील एका डाॅक्टरांच्या रुग्णालयात उपचारासाठी २३ एप्रिलला दाखल केले. अधिक तपासणी केली असता संबंधित रुग्णांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, तेथे तसा बेड उपलब्ध न झाल्याने सचिन इंगळे यांनी त्यांचे नातेवाईकामार्फत आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मसीस्ट म्हणून काम करणारे अमोल बुधा पवार यांच्याशी संपर्क केला. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या भोसरी येथील हाॅस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देतो मला प्रत्येक बेडप्रमाणे ४५ हजार रुपयांची मागणी पवार यांनी केली. अमोल पवार यांनी त्यांना २४ एप्रिल रोजी बेड उपलब्ध करून दिले. तसेच इंगळे यांच्याशी संपर्क करत पैसे देण्यास सांगितले. इंगळे यांनी पवार यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने १ लाख ८० हजार रुपये पाठवले.
दरम्यान, यानंतर काही दिवसांतच सचिन इंगळे यांचे दोन भाऊ व आई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर सचिन इंगळे आळे येथे आले. सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, सदस्य बाजीराव लाड, प्रकाश वाघोले, शिवाजी वाव्हळ, विलास वाव्हळ यांना झालेला प्रकार इंगळे यांनी सांगितला. त्यांनी अमोल पवार याला याबाबत विचारणा केली असता त्याने बेड मिळवून देण्याचे नावाखाली इंगळे यांच्याकडून पैसे घेतल्याचे सांगितल्याने फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.
सचिन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अमोल बुधा पवार याच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले अधिक तपास करत आहेत.