हवेली तालुक्यातील १ लाख ८२ हजार ५५ मतदार ७५६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:17+5:302021-01-14T04:10:17+5:30
हवेली तालुक्याचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार : जिल्हा व पोलीस प्रशासन मतदानासाठी सज्ज झालं आहे. तालुक्यातील १४३ ...
हवेली तालुक्याचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार : जिल्हा व पोलीस प्रशासन मतदानासाठी सज्ज झालं आहे. तालुक्यातील १४३ प्रभागातील २०९ बूथवर २११ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यादृष्टीने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यासह मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. यांसाठी १ हजार २६० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर पोलीस प्रशासन देखील निवडणूक प्रकियेसाठी सज्ज झाले आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून या वेळी मतदान यंत्रात कुठलीही खराबी येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काही अडचण आल्यास तत्काळ मदत पुरवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी सर्व केंद्र प्रमुखांनी आपापल्या मतदान केंद्राचे साहित्य तपासून ताब्यात घेतले आणि हे कर्मचारी साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले आहेत.
इलेक्शन ड्युटीसाठी आपल्या मतदारसंघातून दूरवर असलेले कर्मचारी मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. या कर्मचाऱ्यांना मतदानकरिता यावं यासाठी निवडणूक प्रशासनाने स्वतंत्रव्यवस्था केली आहे. यामुळे सर्व कर्मचारी पोस्टलद्वारे मतदान करू शकणार आहेत.