रोजचे प्रवासी १ लाख, ऑनलाईन तिकिटे फक्त तीनशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:53+5:302021-08-26T04:13:53+5:30
ऑनलाईन सुविधांबाबत प्रवासी अनभिज्ञ : ‘एसटी’कडून जागृतीची गरज लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात रोज ...
ऑनलाईन सुविधांबाबत प्रवासी अनभिज्ञ : ‘एसटी’कडून जागृतीची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात रोज सरासरी १ लाख प्रवासी प्रवास करतात. यातले केवळ तीनशे तिकिटे ऑनलाईन विकली जातात. काउंटर वरून जेमतेम २६० तिकिटांची विक्री होते. अनेक प्रवाशांना ऑनलाईन तिकीट कसे काढायचे हेच माहीत नाही. शिवाय एसटीकडून देखील याबाबत प्रवाशांमध्ये जागृतीसाठी फार प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी १ लाख प्रवाशांमधील अवघे तीनशे जण ऑनलाईन तिकीट काढून प्रवास करतात.
राज्य परिवहन महामंडळाने २०११ साली म्हणजेच १० वर्षांपूर्वी प्रवासी गाडीत ऑनलाईन पद्धत अंमलात आणली. मात्र आजतागायत त्याचा फारसा वापर झाला नाही. पहिल्यापासूनच याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी ऑनलाईन सुविधेसाठी प्रवाशांकडून खूप कमी प्रतिसाद मिळतो. ज्या गाड्यांचे ऑनलाईन तिकीट काढण्यात येते त्यात सर्वाधिक गाड्या पुणे-मुंबई, पुणे-ठाणे मार्गाचा समावेश आहे.
बॉक्स १
अनेकांना माहीतच नाही :
मोबाईलवरून ऑनलाईन तिकिटे काढता येऊ शकते हेच अनेकांना माहीत नाही. त्यामुळे ऑनलाईन तिकीट प्रणालीस प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. बसस्थानकावर देखील या बाबत जनजागृतीसाठी माहिती दिलेली नसते. अनेक चालक-वाहक याबाबत फार गंभीर नसतात. त्यांनादेखील विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
बॉक्स २
तक्रारीचा हवा तत्काळ निपटारा
ऑनलाईन तिकीट यंत्रणा ही प्रवाशांसाठी सुलभ असली पाहिजे. अनेकदा तिकीट काढताना गाडीतले आसन ‘बुक’ न होताच बँक खात्यातून पैसे वजा होतात. काहीवेळी ज्या गाडीचे तिकीट काढायचे त्याऐवजी दुसऱ्याच गाडीचे तिकीट मिळते. या बाबत तक्रार कुठे करायची, तक्रारीची दखल कोण घेते याची माहिती नसल्याने अनेक प्रवासी ऑनलाईनच्या झंझटीत पडणे पसंत करत नाहीत.
बॉक्स ३
असे करावे ऑनलाईन बुकिंग
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा प्ले-स्टोअर वर ‘एमएसआरटीसी प्रवासी’ हे ॲॅप डाऊनलोड करूनदेखील ऑनलाईन तिकीट काढता येते. ॲॅपवर गाड्यांचा प्रकार, मार्ग, गाड्यांची वेळ, तिकीट दर आदी माहिती दिलेली असते. त्याचा वापर करून प्रवासी ऑनलाईन तिकीट काढून प्रवास सुखकर करू शकतात.
चौकट
“अनेकदा एसटी प्रवास केला. मात्र ऑनलाईन तिकिटाची माहितीच मिळाली नाही. या बाबत माहिती असती तर निश्चितच ऑनलाईन तिकीट काढून एसटीचा प्रवास केला असता. एसटीने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”
-यशवंत पोपळे, प्रवासी
चौकट
“मी यापूर्वी एक ते दोन वेळेस ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिकीट काढता आलं नाही. त्यानंतर मी पुन्हा प्रयत्न केला नाही.”
-राहुल भूमकर, प्रवासी
चौकट
“एसटीने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना ऑनलाईन तिकीट प्रणालीबाबत माहिती नाही व त्यांना त्याद्वारे तिकीटदेखील काढता येत नाही. प्रवाशांध्ये ऑनलाईन तिकीटांबाबत जागृती निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केला जाईल.”
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे